मुख्यमंत्री डॉ. सावंत; कोविड रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज
पणजी : राज्यात करोनाचा सामाजिक संसर्ग नाही. सध्या जे कुणी करोनाबाधित सापडत आहेत ते बाहेरून रेल्वे किंवा अन्य वाहनांतून येणारे आहेत. या सर्वांची कडक तपासणी आणि चाचणी केली जाते. करोनाबाधितांना कोविड-१९ इस्पितळात पाठवले जात आहे. पुढील सप्तकात ‘राजधानी एक्सप्रेस’ रेल्वेगाडी मडगाव स्थानकावर थांबवण्यास हरकत घेतली आहे. सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे आणि त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
देशातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत लांबला आहे. राज्य सरकारकडून यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी संध्याकाळी जारी होतील. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आणखी काही सूट मिळणार आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने अडवली जाऊ शकत नाहीत. तरीही या वाहन चालकांची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. उर्वरित प्रत्येकाची तपासणी आणि चाचणी करूनच प्रवेश दिला जातो. शनिवारी ‘राजधानी एक्सप्रेस’ रेल्वेतून ३६८ प्रवासी गोव्यात आले. यापैकी बहुतांशांकडे आधारकार्ड तथा मतदार ओळखपत्र असल्याने ते इथले रहिवाशी आहेत, हे सिद्ध होते. त्यांची जिल्हा इस्पितळात चाचणी केल्यानंतर त्यांना फातोर्डा स्टेडियमवर ठेवण्यात आले. शनिवारी हा पहिलाच प्रयोग होता आणि त्यामुळे काही प्रमाणात लोकांचे हाल झाले. रविवारपासून या सर्वांना हॉटेलात विलगीकरण केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
ज्या कुणाचे चाचणी अहवाल निगेटिव्ह येते त्याला घरीच विलगीकरणासाठी पाठवले जाते. जे कुणी पॉझिटीव्ह येतात त्यांची रवानगी कोविड-१९ इस्पितळात केली जाते. रविवारी रेल्वेच्या एका बुगीमध्ये काही प्रवासी पॉझिटीव्ह सापडल्याने या बुगीतील सर्वांना सरकारी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजनानुसार होणार आहे. राज्यात सापडलेले करोनाचे रुग्ण हे केवळ बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे राज्यांतर्गत करोनाचा संसर्ग नसल्याने कुणीही चिंता करण्याचे कारण नाही. बहुतांश पालकांनी परीक्षांचे स्वागत केले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
उपचारांसाठी गोवा सज्ज
मडगाव कोविड-१९ इस्पितळाची क्षमता १०० खाटांची आहे. तिथे आणखी ७ खाटा वाढवणे शक्य आहे. जर सगळेच रुग्ण लक्षणेविरहित असतील तर ही क्षमता १६० खाटांपर्यंत वाढवता येते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तूर्त कोविड इस्पितळात २० ते २५ व्हेंटिलेटर्सची सोय करता येईल, असेही ते म्हणाले. सध्या फक्त दोन रुग्णांमध्ये किंचित लक्षणे आढळून आली आहेत तर उर्वरित सर्व रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत. पुढे रुग्णांचा आकडा वाढला तरच खाटांची संख्या वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
परीक्षांबाबत गैरप्रचार नको...
- राज्यातील नियोजित दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. कुणीही विनाकारण परीक्षांबाबत गैरप्रचार करून मुलांमध्ये भीती निर्माण करू नये.
- मुलांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाईल. सुमारे २,४६० वर्ग सज्ज करण्यात आले आहेत.
- परीक्षेसाठी पंचायतनिहाय केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक अंतर तसेच अन्य सुरक्षा उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल.
- राज्यातील सीमाभागात परराज्यांतील मुलांसाठी तेथीलच सीमेनजीकच्या शाळांची व्यवस्था केली जाणार आहे.