उपसभापतींच्या पुत्राचे पदवी प्रमाणपत्र बोगस
पणजी : उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा पुत्र रेमंड फर्नांडिस याची उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकूनपदावर निवड झालेली आहे. मात्र, या पदासाठी जोडलेले पदवी प्रमाणपत्र बोगस असल्याचे गोवा विद्यापीठाने जाहीर केले आहे. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे पदवीचा दावा केलेला रेमंड अव्वल कारकून पदाच्या अंतिम लेखी परीक्षेत मात्र ५० पैकी ४७ गुण प्राप्त करून सर्वसाधारण गटात चौथ्या क्रमांकावर आहे.
प्राथमिक परीक्षेत सर्वसाधारण गटात अव्वल दहाजणांतही नसलेला आणि त्यात बोगस प्रमाणपत्र धारण केलेला रेमंड हा अंतिम लेखी परीक्षेत ५० पैकी ४७ गुण प्राप्त करून चक्क चौथ्या स्थानावर येतो, यावरूनच या अंतिम यादीबाबतची पारदर्शकता आणि विश्वासाहर्ताच धोक्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी रेमंड याचे बोगस प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणून या भरतीच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सर्व १६ उमेदवार भाजप मतदारसंघांतीलच
महसूल खात्यात अव्वल कारकून हे महत्त्वाचे पद आहे. या पदांसाठी निवड झालेल्या अंतिम १६ जणांच्या यादीत अनेक सत्ताधारी मंत्री, आमदार यांचे नातेवाईक तथा जवळचे लोक असल्याचाही बोलबाला सुरू आहे. विशेष म्हणजे, सर्व अंतिम १६ उमेदवार हे सत्ताधारी भाजप मतदारसंघातीलच आहेत. महसूल खाते जेनिफर मॉन्सेरात यांच्याकडे आहे. त्या ताळगावच्या आमदार आहेत. बाबूश मॉन्सेरात हे पणजीचे आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मिळून ७ उमेदवारांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी आणि उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या काणकोण मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडले गेले आहेत. यापैकी एक पद खुद्द इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र रेमंड यांना मिळाले आहे. बोगस प्रमाणपत्राची खातरजमा झाली असली तरी सरकारकडून अव्वल कारकूनपदांच्या भरतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन करण्यात आलेले नाही.
भरती प्रक्रियेतील प्रश्नावर खुलासा करा : डिमेलो
महसूलमंत्री जेनिफर मॉन्सेरात यांनी अव्वल कारकूनपदांच्या भरतीसंबंधी सुरू असलेल्या चर्चेबाबत खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्र पाठवून केली आहे. या प्रकरणाची वेळेत चौकशी झाली नाही तर, संबंधितांकडे दाद मागितली जाईल, असेही ते म्हणाले. सरकारला खरोखरच ही भरती प्रामाणिकपणे झाली आहे, असे वाटत असेल तर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची ओएमआर उत्तर पत्रिका जाहीर कराव्यात, असे आव्हान डिमेलो यांनी केले.
ठळक वैशिष्टे
- उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून १६ अव्वल कारकून(एके) पदांसाठी अर्ज मागवले
- प्राथमिक लेखी परीक्षेसाठी २५ ऑगस्ट २०१९ रोजी ६,५०३ उमेदवारांची नोंदणी. प्रत्यक्षात ४,४१६ जणांचा सहभाग
- अंतिम लेखी परीक्षेसाठी १७३ जणांची निवड
- १८ जानेवारी २०२० रोजी अंतिम लेखी परीक्षा. यातून १६ जणांची निवड
- १६ पदांमध्ये सर्वसाधारण (९), इतर मागासवर्गीय (३), अनुसूचित जमाती (२), माजी सैनिक (१), दिव्यांग (१)
- अंतिम निवड झालेले सर्व १६ उमेदवार भाजप आमदारांच्या मतदारसंघांतील
- पणजी (४), ताळगांव (३), साखळी (२), काणकोण (२), डिचोली, मांद्रे, हळदोणा, केपे, कळंगुट (प्रत्येकी एक)
- सर्वसाधारण गटातून निवड झालेल्या ९ उमेदवारांपैकी केवळ ४ प्राथमिक परीक्षेतील अव्वल दहाच्या यादीत होते.
- प्राथमिक परीक्षेत सर्वसाधारण गटातून अगदी शेवटी ३३ गुण प्राप्त केलेला साखळी मतदारसंघातील एक उमेदवार अंतिम परीक्षेत मात्र चक्क ४७ गुण प्राप्त करून तिसऱ्या स्थानावर पोहोचून निवडला गेला.
- प्राथमिक परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या उमेदवारांची एकूण संख्या ६५०३ होती, परंतु ओबीसी गटातून अंतिम परीक्षेत निवड झालेल्या एका उमेदवाराचा रोल नंबर ६५१४ दाखवण्यात आला आहे.
- दिव्यांग यादीत प्राथमिक परीक्षेत २५ गुण मिळून तिसऱ्या स्थानावर असलेला कळंगुट मतदारसंघातील एक उमेदवार अंतिम परीक्षेत मात्र ४० गुण मिळवून प्रथम आला.
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरटीआयखाली अंतिम यादीत निवड झालेल्या उमेदवारांची ‘ओएमआर’ उत्तरपत्रिका देण्यास नकार