‘लॉकडाऊन’च्या चौथ्या टप्प्यात आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता

मुख्यमंत्र्यांची माहिती; सामाजिक अंतराचे प्रामाणिकपणे पालन करण्याचेही आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th May 2020, 04:12 pm

पणजी : करोनावर मात करण्यासाठीचा लॉकडाऊन यापुढेही सुरू राहील. पण या काळात राज्याची अर्थव्यवस्था कोलमडू नये, यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवर काम करीत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता आणली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी स्पष्ट केले.
लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांत सरकारने बहुतांशी कंपन्या, उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यास मुभा दिली होती. खनिज वाहतूकही सुरू ठेवली होती. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने गेल्या महिन्यात महसुलात घट झाली होती. पण आता आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता मिळणार असल्याने या महिन्यातील महसुलात वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यात आतापर्यंत सापडलेले सर्वच करोनाबाधित परराज्यांतून तसेच देशांतून आलेले आहेत. गोव्यात असलेल्या एकाही व्यक्तीला अद्याप करोनाची लागण झालेली नाही. यातून राज्यात समूह संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर तसेच करोनासंदर्भातील उपाययोजनांचे प्रामाणिकपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.




गोवा बोर्डला सरकारचे पूर्ण सहकार्य
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी गोवा बोर्डने घेतली आहे. परीक्षेसाठी २,४०० वर्ग तयार ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी बसविले जाणार असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांची चिंता तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊनच परीक्षा घेण्याचा निर्णय गोवा बोर्डने घेतला आहे. त्यामुळे सरकारचे बोर्डला पूर्ण सहकार्य मिळेल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.


सुमारे २० हजार गोमंतकीय इतर राज्ये तसेच देशांतून गोव्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक चाचणी, क्वारंटाईनची पूर्ण व्यवस्था सरकारने केली आहे. गरज भासल्यास आणखी दोन इस्पितळांत कोविड उपचारांची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.