क्वारंटाईनसाठी घेतलेली पणजीतील हॉटेल्स रद्द करा!

आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी मागणी केल्याची महापौरांकडून माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th May 2020, 06:03 am

पणजी : क्वारंटाईनसाठी घेण्यात आलेली पणजीतील हॉटेल्स रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी शनिवारी दिली.
क्वारंटाईनसाठी घेण्यात आलेल्या पणजीतील विविध हॉटेल्समध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे तेथे ठेवलेल्या व्यक्तींबाबत संशय निर्माण झाला आहे. या व्यक्ती बाहेर फिरतात, अशी भीती स्थानिकांत निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आमदार मॉन्सेरात यांची भेट घेऊन क्वारंटाईनसाठी घेण्यात आलेली पणजीतील हॉटेल्स रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार मॉन्सेरात यांनीही तशी मागणी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, असे मडकईकर म्हणाले.
करोना संशयित जेथे सापडतील, त्याच भागातील हॉटेल्स क्वारंटाईनसाठी वापरण्यात यावी. पणजी परिसरातील नेमकी कोणती हॉटेल्स सरकारने क्वारंटाईनसाठी घेतली आहेत, तेच समजत नाही. त्यामुळे मोठा गोंधळ माजला असून, यापुढे पणजीतील हॉटेल्स घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार मॉन्सेरात आणि आपल्यासोबत चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.


उद्यापासून इमारतींचे निर्जंतुकीकरण
राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने इमारती निर्जंतुकीकरणासाठी महापालिकेला फोन येत आहेत. आतापर्यंत तीन इमारतीमधील रहिवाशांकडून निर्जंतुकीकरणाबाबत फोन आले आहेत. सोमवारपासून या कामास प्रारंभ केला जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.


मार्केटबाबतचा निर्णय उद्या घेणार
करोनाबाधित रुग्ण वाढू लागल्याने राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होण्याच्या भीतीने पणजी मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. पण सध्या राज्यात अन्नधान्याचा मुबलक पुरवठा असल्याने नागरिकांनी चिंता करू नये. सामाजिक अंतर राखून साहित्याची खरेदी करावी. राज्य सरकारकडून रविवारपर्यंत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी होतील. त्यानंतरच मार्केटसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी म्हटले आहे.