दिल्लीतून २८२, तिरुअनंतपुरम येथील ३६ जण गोव्यात
मडगाव : दिल्ली आणि केरळ राज्यात अडकलेल्या गोवेकरांना घेऊन दोन विशेष रेल्वे गाड्या शनिवारी मडगाव स्थानकावर दाखल झाल्या. दिल्लीवरून आलेल्या ‘राजधानी एक्सप्रेस’मधून २८२ प्रवासी तर तिरुअनंतपुरम येथून आलेल्या गाडीतून ३६ प्रवासी गोव्यात दाखल झाले. प्रवाशांची आरोग्य चाचणी झाल्यानंतर क्वारंटाइनबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दिल्ली ते मडगाव या मार्गावर धावणारी ‘राजधानी एक्सप्रेस’ शनिवारी मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली. याआधी रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता केवळ विशेष व श्रमिक रेल्वे सुरू राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना गोव्यातील बस थांबा देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या मागणीला नकार दर्शवला. शनिवारी तिरुअनंतपुरम ते दिल्ली या गाडीतून मडगाव रेल्वे स्थानकावर ३६ प्रवासी दाखल झाले, तर राज्यातील १०० प्रवासी या गाडीतून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
दिल्ली येथून आलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून २८२ प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले. या रेल्वेतून सुमारे ८२८ गोमंतकीय दाखल होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार दक्षिण जिल्हा रुग्णालयात ६० तपासणी पथकांची तयारी करून ठेवण्यात आली होती. राजधानी एक्स्प्रेसमधून दाखल झालेल्या प्रवाशांना कागदोपत्री प्रक्रिया व स्वॅब टेस्टिंगचे पैसे भरून झाल्यावर दक्षिण जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात येत होते. यासाठी विशेष बसची सोय करण्यात आली होती.
राजधानी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या २८२ पैकी २७८ प्रवाशांना आरोग्य तपासणीसाठी दक्षिण जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. आरोग्य तपासणी अहवाल येईपर्यंत या सर्व प्रवाशांना फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ठेवण्यात आले आहे. आरोग्य तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात येईल. पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या प्रवाशांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात येईल.
प्रवाशांचा टेस्टचे पैसे भरण्यास नकार
राजधानी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या १७ प्रवाशांनी स्वॅब टेस्टिंगसाठी दोन हजार रुपये भरण्यास नकार दिला. आपण गोमंतकीय असून गोमंतकीयांकडून पैसे घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. असे असताना पैसे कसे मागता, असा सवाल त्या प्रवाशांनी केला. काही कालावधीनंतर अकरा प्रवाशांनी टेस्टिंगचे पैसे भरले तर ६ प्रवाशांनी उशिरापर्यंत पैसे भरले नव्हते. पैसे न भरलेल्या प्रवाशांना उशीरापर्यंत रेल्वेस्थानकावर ठेवण्यात आले होते.