मडगाव : ६० हजारांपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी असूनही जनतेची साधी कामे होत नाहीत. लोकांची सतावणूक थांबवा आनी कामांना प्राधान्य द्या असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी आज नावेली येथे सरकार तुमच्या दारी कार्यक्रमावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना दिला.
सामान्य जनतेच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिक गतिमान व तत्परतेने काम करावे, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली येथील कार्यक्रमावेळी शासकीय अधिकाऱ्यांना दिली. मुख्यमंत्री स्वतः जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असताना अधिकाऱ्यांनीही त्याच तत्परतेने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
नावेली मतदारसंघात आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार उल्हास तुयेकर, जिल्हाधिकारी तसेच विविध सरकारी खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात पंचायत स्तरावरील बांधकाम परवाने, जमिनीची फाळणी, वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले ना-हरकत दाखले (एनओसी) मिळण्यात येणाऱ्या अडचणींच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘माझे घर’ योजना, २० कलमी कार्यक्रम आणि सरकारी जमिनीवरील घरांच्या नियमितीकरणाशी संबंधित प्रकरणे वेळेत निकाली काढण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते तसेच मलनिस्सारण वाहिन्यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्यांवरही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मलनिस्सारण महामंडळाला तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
७० टक्के प्रश्नांचा निपटारा
या शिबिरात सुमारे २०० टोकनांच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यापैकी जवळपास ७० टक्के प्रश्नांचा संबंधित प्रशासकीय यंत्रणेमार्फत जागीच निपटारा करण्यात आला आहे. उर्वरित ३० टक्के प्रकरणे गुंतागुंतीची असल्याने त्यांच्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा आणि मामलेदारांना ही प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आदेश दिले असून, मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी स्तरावरूनही त्यांचा नियमित पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. जनतेच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रम राज्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


