इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक; दिल्लीत पोहोचले विषारी ढग

विमान उड्डाणांना फटका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक; दिल्लीत पोहोचले विषारी ढग

नवी दिल्ली : इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक (Ethiopia Volcanic Eruption) झाला असून, त्यामुळे भारताच्या (India) दिशेने एक नवे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विषारी ढग दिल्लीत (Delhi) पोहोचले आहेत.

त्याचा फटका विमान उड्डाणांना बसू लागला आहे. अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.  ऍर इंडियासहीत (Air India),  इंडिगो (Indigo),  अकासा, केएलएम या कंपन्यांनी विमाने रद्द केली आहेत. 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गेली दहा हजार वर्षे सुप्तावस्थेत असलेल्या इथिओपियातील हॅले गुब्बी नावाच्या ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. या उद्रेकामुळे लाल समुद्राला लागून असलेले आखाती देश विषारी वायू आणि राखेने झाकोळून गेले.

हा विषारी वायू आणि राख सोमवारी रात्री उशीरा पर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या नव्या संकटामुळे काही विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे रद्द केली आहेत.

त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशातील विमान कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे. 

इथिओपियातील अफार प्रदेशात हॅले गुब्बी ज्वालामुखी आहे. गेली १० हजार वर्षे शांत होता. मात्र, अचानक त्याचा उद्रेक झाला. त्यामुळे शास्त्रज्ञांसहीत सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले आहे.

उद्रेक झालेला भाग अतिशय दुर्गम आहे व त्याठिकाणी कुठलीही मॉनिटरींग यंत्रणा नाही. उद्रेक झाल्यानंतर राख व सल्फर डायऑक्साइड मिश्रित ढग आकाशात सुमारे १५ किलोमीटर उंच दाटले आहेत.

हे ढग भारतातील पंजाब, राजस्थान ते दिल्लीपर्यंत सोमवारी रात्रीपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा फटका विमान वाहतुकीला बसू लागला आहे.  इंडिगो, अकासा तसेच केएलएम या कंपन्यांनी काही उड्डाणे रद्द केली आहेत. 

हेही वाचा