घुसखोरीसाठी एलओसी, आंतरराष्ट्रीय सीमा बनू शकते नवा मार्ग

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाचे पडसाद आता थेट आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचले आहेत. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी कोणतीही गैरकृत्ये करण्याची शक्यता असल्याने, या संवेदनशील भागांमध्ये भारतीय सैनिकांची आणि निमलष्करी दलाची तैनाती मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर केंद्र आणि राज्य गुप्तचर यंत्रणा दक्षपणे सुरक्षेच्या विविध मुद्यांवर खलबते करत आहेत. हाती लागलेल्या काही इनपुट्सच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसी या दोन्ही क्षेत्रांमध्ये सुरक्षा दलाची संख्या दुप्पट करण्यात आली असून, रात्रंदिवस गस्त घालण्याची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळेही पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भौगोलिकदृष्ट्या सिंध जरी आज भारताचा भाग नसेल, तरी सभ्यतेच्या दृष्टिकोनातून सिंध हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील. सीमा बदलू शकतात, उद्या सिंध पुन्हा भारतात परत येईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळेही सीमाभागात हालचाल वाढली आहे.

घुसखोरीसाठी नवा मार्ग
माहितीनुसार, सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे १३१ दहशतवादी सक्रिय असून, त्यापैकी ११७ पाकिस्तानी आहेत. सीमापार मोठ्या संख्येने दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पुंछ-राजौरी सेक्टरमध्ये बर्फवृष्टी आणि खोल धुक्यांमुळे एलओसीमार्गे घुसखोरी करणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे आता दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमेचा (IB) वापर घुसखोरीचा नवा मार्ग म्हणून करण्याची तयारी करत असल्याचा गुप्तचर यंत्रणांना इनपुट मिळाला आहे. यामुळेच बीएसएफ आणि सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील तैनाती दुप्पट केली आहे.

ड्रोन हल्ल्याचे मोठे आव्हान
जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून अगदी जवळून ड्रोनचा वापर वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान ड्रोनचा धोका प्रकर्षाने जाणवला. या पार्श्वभूमीवर, आता सैन्याकडून जवानांना शत्रूचे ड्रोन शोधणे आणि ड्रोन निकामी करणे याचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक गस्त घालणाऱ्या पथकात आता 'अँटी-ड्रोन गियर' आणि प्रशिक्षित जवान समाविष्ट करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर महिला अधिकारी आणि जवानही तैनात असून, त्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत.
