मोरजीतील मुख्य रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर होणार कारवाई

मोरजीचे सरपंच विलास मोरजे यांचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 mins ago
मोरजीतील मुख्य रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर होणार कारवाई

पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील नो पार्किंग झोनमध्ये नियमांचा सर्रास भंग होत असून, फलक लावलेल्या ठिकाणी तासन्‌तास वाहने उभी केल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर अशा वाहनांवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मोरजीचे सरपंच विलास मोरजे यांनी दिली.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोरजीतील मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांवरील काही निवडक ठिकाणांना नो पार्किंग झोन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. पंचायत समितीने गेल्या वर्षी या ठिकाणी अधिकृत फलकही बसवले. मात्र याकडे दुर्लक्ष करून काही वाहनमालक मुद्दामच रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून, नागरिकांचा त्रास वाढला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या विषयावर तीव्र चर्चा झाली. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या नाराजीला उत्तर देताना सरपंच मोरजे म्हणाले, नो पार्किंग झोनमध्ये जर कोणी वाहन उभे केले तर त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्यापूर्वी पंचायतीतर्फे जनजागृती मोहीम राबवली जाईल.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पेडणे वाहतूक पोलीस आणि मोरजी पंचायत यांची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावर नो पार्किंग फलक अधिकृतपणे बसवल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाईल, असेही सरपंच मोरजे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा