पर्यटन हंगाम शिगेला असताना अपघातांत लक्षणीय वाढ; विदेशी जोडप्याने टिपला धोकादायक प्रवास

पणजी: गोव्यात १ ऑक्टोबर २०२५ पासून पर्यटन हंगाम शिखरावर पोहोचला असून, रोज हजारो देशी-विदेशी पर्यटक गोव्यात ये-जा करत आहेत. यामुळे एरवीही जाणवणारा वाहतुकीचा ताण सध्या सर्वत्र अधिकच जाणवत आहे. या वाढत्या गर्दीसोबतच ऑक्टोबर महिन्यापासून अपघातांचे प्रमाण देखील लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, पणजीत आपल्या प्रवासाचे चित्रण करणाऱ्या एका विदेशी पर्यटक जोडप्याच्या 'गो-कॅम' मध्ये गोव्यातील वाहतुकीतील बेजबाबदारपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सकाळच्या वेळी दोन्ही मांडवी पूलांवरील वाहतूक प्रचंड असते. पर्वरीमार्गे पणजीला येणाऱ्या नोकरदार वर्गाचे यात प्रमाण मोठे असते. याच वेळेत एक तरुण भरधाव वेगाने दुचाकी चालवत चक्क फोनवर बोलत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. हा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार पाहून, त्याला ओव्हरटेक करून पुढे जाताना या पर्यटक जोडप्याने आपली मान नकारार्थी हलवली. 'किती रे हा बेजबाबदारपणा तुझा?' असेच काहीसे त्यांना त्याला म्हणावेसे वाटले असावे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांनी निदान आता तरी स्वतःसह दुसऱ्यांचे आयुष्य धोक्यात घालणे बंद करावे आणि सुज्ञपणाने वागावे, असा सूर आता सर्वसामान्य नागरिक आणि समाजमाध्यमांवर उमटला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या पर्यटकांनी हा व्हिडिओ शेअर केला, ते स्वतः मांडवी पुलावर इतर वाहनांना ओव्हरटेक करून पुढे गेलेत. तसेच त्यांनी खाजगी दुचाकी भाडेपट्टीवर घेतल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. फोन वापरणारा दुचाकीस्वार आणि पर्यटक जोडप्यावर वाहतूक खात्याने कारवाई करावी अशीही मागणी जोर धरत आहे,
१० महिन्यांत १,९२५ अपघात, २१२ मृत्यू
जानेवारी ते नोव्हेंबर ३ पर्यंत गोव्यात जवळपास १,९४२ अपघात नोंदवले गेले आहेत. यातील बहुसंख्य अपघात हे अतिवेग, मद्यपान करून गाडी चालवणे आणि बेदरकार ड्रायव्हिंग यामुळे झाल्याचे दिसून येते. गोवा वाहतूक पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात २०५ जीवघेणे अपघात नोंदवले गेले, ज्यात २१२ लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत (२२९ जीवघेणे अपघात आणि २४१ मृत्यू) किंचित कमी असली तरी, अपघातांचे गंभीर स्वरूप कायम आहे.

गंभीर अपघातांत वाढ
या वर्षी गंभीर जखमी झालेल्या अपघातांची संख्या १५१ वरून १८९ पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ अपघातांची संख्या कमी झाली असली तरी, त्यांची तीव्रता खूप वाढली आहे, जे गंभीर चिंतेचे कारण आहे. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या तीन दिवसांत गोव्यात सुमारे १७ अपघात नोंदवले गेले. या अपघातांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. नंतर ४ नोव्हेंबर रोजी , मंगळवारी बांबोळी येथे झालेल्या भीषण अपघातामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. योगेंद्र सिंग आणि अंकित कुमार बलियान या दोघांचा, भरधाव वेगातील टँकरने दुभाजक ओलांडून भाड्याच्या कारला धडक दिल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी टँकर चालकावर निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तर काल पर्वरी येथे झालेल्या रस्ते अपघातात गंभीर जखमी लावण्या जून (१८, दिल्ली) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कारवाई आणि आव्हाने
अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने विशेषतः आठवड्याच्या शेवटी कारवाई तीव्र केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत, अतिवेगासाठी १४,५०६, मद्यपान करून गाडी चालवल्याबद्दल ३,३६१ आणि बेदरकार ड्रायव्हिंगसाठी ८३ चलन जारी करण्यात आले आहेत. गोव्यातील रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा वाटा मोठा आहे. या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत एकूण १२३ दुचाकी अपघात झाले, ज्यात २५ मृत्यू झाले. मागील वर्षी याच काळात १३८ अपघात आणि ३६ मृत्यू झाले होते.

सरकार गोव्यात घडणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना आखत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि भटकी जनावरे ही जरी अपघातास कारणीभूत ठरणारी मुख्य कारणे असली, तरी मानवी चुकांचा वाटा त्याहून अधिक आहे. एकूण अपघातांपैकी जवळपास ७० टक्के अपघातांसाठी मानवी चुका कारणीभूत ठरत आहेत. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण नसणे, धोकादायक ठिकाणी पुढील वाहनाला ओव्हरटेक करणे, अमली पदार्थांचे सेवन किंवा दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवणे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.