राज्यातील पाच हजार टॅक्सी अ‍ॅपवर

‘गोवा माईल्स’, ‘गोवा टॅक्सी’ कार्यरत : इतरांनाही प्रवेशाची संधी


11th June, 12:32 am
राज्यातील पाच हजार टॅक्सी अ‍ॅपवर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील सुमारे पाच हजार टॅक्सी अ‍ॅपच्या माध्यमातून रस्त्यावर धावत आहेत. आतापर्यंत ८० लाखांहून अधिक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी या अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवेचा लाभ घेतला आहे. ‘गोवा माईल्स’ आणि राज्य सरकारची ‘गोवा टॅक्सी’ हे अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देत आहेत. सरकारने टॅक्सी चालकांना अ‍ॅपच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक खात्याने अधिसूचना जारी करून बाहेरील टॅक्सी अ‍ॅप (अ‍ॅग्रिगेटर) सेवांनाही राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे ‘ओला’, ‘उबर’सारख्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी लवकरच गोव्यात दिसू शकतात. मात्र, गोव्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
‘गोवा माईल्स’ अ‍ॅपवर चार हजार, तर ‘गोवा टॅक्सी’ अ‍ॅपवर एक हजार टॅक्सींची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झालेल्या ‘गोवा माईल्स’ अ‍ॅपच्या टॅक्सी सेवेचा लाभ आतापर्यंत ८२ लाख पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. या टॅक्सींनी ७.८ कोटी किलोमीटर प्रवास केला असून, दररोज सरासरी १५ हजार जण या सेवेचा लाभ घेत आहेत. या सेवेमुळे राज्य सरकारला १३.०३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती ‘गोवा माईल्स’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी ‘गोवा माईल्स’ अ‍ॅप सुरू झाले. ऑक्टोबर २०२३ मध्ये सरकारने स्वतःचे ‘गोवा टॅक्सी’ अ‍ॅप सुरू केले. आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांनी ‘गोवा टॅक्सी’ अ‍ॅपच्या सेवेचा लाभ घेतला आहे.
अॅपआधारित सेवेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना
अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी सहजपणे टॅक्सीचे बुकिंग करू शकतात. अ‍ॅपमध्ये रिअल-टाइम स्थान माहिती, अधिकृत दरानुसार भाडे, गुगल मॅप, वेगवेगळे पेमेंटचे पर्याय, तसेच चालक आणि प्रवाशांसाठी आपत्कालीन सेवा उपलब्ध आहेत, असे पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम अनुभव देण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या सेवा सध्या मोपा विमानतळ आणि मडगाव रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहेत.