गोव्यासाठी व्हिजन डॉक्युमेंटचे काम सुरू असल्याचेही केले स्पष्ट
‘संकल्प से सिद्धी’ कार्यक्रमात माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या अकरा वर्षांत गोव्यासह देशाला अमृतकाळात नेले. केंद्र सरकारने २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे ध्येय ठेवले आहे. आपल्या सरकारने मात्र २०३७ पर्यंत विकसित गोव्याचा निर्धार केला असून, त्यासंदर्भातील व्हिजन डॉक्युमेंटही येत्या १९ डिसेंबरपर्यंत बनवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
‘संकल्प से सिद्धी’ या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मंगळवारी पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकारने २०१४ मध्ये गोव्यासह संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प मोदींनी सिद्ध करून दाखवला आहे. देशाचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास साधून मोदींनी देशाला अमृतकाळात आणले आहे. त्यामुळे २०४७ चा विकसित भारत दूर नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गेल्या अकरा वर्षांत देशातील विमानतळांची संख्या दुप्पट झाली. विविध सामाजिक योजना घरोघरी पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या विकास साधण्यात केंद्र सरकारला यश आहे. पायाभूत साधनसुविधांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कृषी, आरोग्य, रोजगार आदींबाबत केंद्र सरकारने मोठा विकास साधला आहे. त्यामुळे देशातील गरीबी दूर होऊन दरडोई उत्पन्नात वाढ झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रगतीची माहिती घराघरांत पोहोचवणार!
केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या अकरा वर्षांत गोव्याची जी प्रगती साधली, त्याची माहिती संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील घराघरांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी शिबिरे, मेळावेही घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वानरमारे समाजाला मुख्य प्रवाहात आणले!
केंद्र सरकारच्या मदतीने गोवा सरकारनेही गेल्या अकरा वर्षांत राज्याचा सर्वच क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणला आहे. राज्यातील भाजप सरकार जाती-धर्माच्या आधारे चालत नाही. तर, युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार तत्त्वांवर चालते. त्यामुळे प्रथमच आपल्या सरकारने वानरमारे समाजापर्यंत सामाजिक योजना पोहोचवून या समाजाला मुख्य प्रवाहात आणले, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.