सिलिंग नूतनीकरणाची गरज असल्याचा पीडब्ल्यूडीचा अहवाल
मडगाव : रवींद्र भवन मडगावच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणखी चार महिने बंद राहणार असल्याची महिती अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याने सिलिंग व भिंतींच्या काही दुरुस्ती सुचवलेल्या आहेत. त्यानुसार बांधकाम खात्याकडून ही कामे हाती घेण्यात येतील, असे सांगण्यात आले.
मडगाव रवींद्र भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र तालक यांंच्यासह सदस्य सचिव स्वाती दळवी, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँथनी बार्बोझा उपस्थित होते. यावेळी तालक यांनी सांगितले की, मडगाव रवींद्र भवनाच्या छताचे काम मे महिन्यात सुरू करण्यात आले होते. मान्सूनपूर्व पावसामुळे ते काम लांबणीवर पडले. छपराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रवींद्र भवन ही वास्तू बांधकाम खात्याकडे आहे. आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांंकडून मुख्य सभागृहासह रवींद्र भवनच्या वास्तूची पाहणी केल्यानंतर सभागृह सुरू केले जाऊ नये, अशा सूचना आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालात सिलिंगची दुरुस्ती करण्याची गरज असून ते बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.
रवींद्र भवनासह एनएक्स इमारतीचे कामही सुरू आहे. त्यासाठी अडीच कोटींचा खर्च करण्यात येत आहे. लवकरात लवकर चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. सरकारकडे निधी उपलब्ध करण्याची विनंती करण्यात येईल. त्यासाठी तीन ते चार महिने रवींद्र भवनातील सभागृह बंद ठेवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. रवींद्र भवनच्या कामाला १८ वर्षे झाली असून काही कामे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
अँथनी बार्बोझा यांनी बांधकाम विभागाच्या अहवालानुसार सभागृहाचे दुरुस्ती काम अत्यावश्यक असून कोणतीही अनुचित घटना न घडण्यासाठी काम पूर्ण होण्यासाठी तियात्रिस्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
.......
तियात्रिस्तांचा तिकीट काउंटरचा प्रश्न सोडवणार
तियात्रिस्तांसोबतही याबाबत बैठक घेण्यात येईल व त्यांना ही माहिती देण्यात येईल. तियात्रिस्तांचाही पाठिंबा रवींद्र भवनाला याआधीही मिळालेला आहे. तियात्रिस्तांचा तिकीट काउंटरचा प्रश्नही सोडवण्यात येईल. सभागृह सुरू करण्याआधी १५ दिवस तियात्रिस्तांना माहिती दिली जाईल.