पणजी : गोव्याची संस्कृती शांतताप्रिय आहे. गोव्यात कामासाठी येणाऱ्या बिहारवासीयांनी गोव्याच्या संस्कृतीचे, येथील सर्वधर्म समभाव विचारधारेचे अनुसरण करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. शनिवारी पणजीत बिहार दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व अन्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपचा एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वावर विश्वास आहे. कामानिमित्त अनेक बिहारवासीय सध्या गोव्यात वास्तव्य करत आहेत. त्यांनी येथील संस्कृती समजून घेतली पाहिजे. गोवेकर शांतताप्रिय, अतिथी देवो भव हे तत्व मानणारे, भांडण न करणारे, येथे येणाऱ्या लोकांवर प्रेम करणारे आहेत. मुळचे बिहारमधील असलेल्या काही लोकांची दुसरी पिढी सध्या येथे राहत आहेत. त्यांनी गोव्याच्या संस्कृतीला आपलेसे केले आहे. बिहारमधून येथे कामास येणाऱ्या अन्य लोकांनी देखील गोव्याची संस्कृती अनुसरली पाहिजे.
ते म्हणाले, गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये बिहारी व्यक्तीचे नाव आलेले बिहारवासीयांना आवडणार नाही. त्यामुळे बिहार मधून येथे येणाऱ्या लोकांना येथील शांतता प्रिय आणि सर्व धर्म समभाव मानणाऱ्या संस्कृती समजावून सांगितली पाहिजे.
काहींची जन्मभूमी बिहार असली तरी गोवा कर्मभूमी आहे. त्यांना गोव्यातील पर्यावरण, संस्कृती येथील लोक आवडतात. गोव्यातील पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये येथील बिहारवासीयांचे योगदान आवश्यक आहे.
डबल इंजिन मुळे बिहारचा विकास
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रात आणि बिहार मध्ये भाजपचे डबल इंजिन सरकार असल्याने बिहारचा विकास होत आहे. स्वयंपूर्ण तसेच विकसित बिहारसाठी राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे.