मिश्र कचर्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा

मडगाव : सोनसडो कचरा यार्डात (Sonsado Garbage Yard) मिश्र कचरा टाकून त्यावर मातीचा भराव टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Goa State Pollution Control Board) पाहणीही केली होती. आता पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई का केली जाऊ नये याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशा आशयाची नोटीस मंडळाने मडगाव पालिका मुख्याधिकार्यांना पाठवली आहे.
मडगाव पालिकेने सोनसडो येथील कचरा यार्डात सुमारे २० टन वर्गीकरण न केलेला व सॅनिटरी पॅड व इतर मिश्र घनकचरा टाकला व त्यानंतर या कचर्यावर मातीचा भराव टाकण्यात येत होता. मिश्र कचऱ्याची अशाप्रकारे विल्हेवाट लावणे हे घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ चे स्पष्ट उल्लंघन आहे आणि यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो.
याबाबत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नुकत्याच झालेल्या तपासणीनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पालिकेकडून जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मंडळ पुढील कोणतीही सूचना न देता, पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करेल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लेविन्सन मार्टिन्स यांनी नोटिसीत नमूद केले आहे. दरम्यान, पालिकेला या नोटिसीवरील अनुपालन अहवाल सात दिवसांच्या आत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
मंडळाने पालिकेला दिलेले निर्देश
* सोनसडो कचरा यार्डात टाकलेला मिश्र कचरा तत्काळ वेगळा करून काढून टाकावा आणि त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावावी.
* सॅनिटरी पॅड आणि इतर जैविक-धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट कुंडई येथील बायोमेडिकल कचरा प्रक्रिया सुविधेत लावण्यात यावी.
* कुंडई येथील सुविधेत पाठवलेल्या सॅनिटरी आणि घरगुती जैविक-धोकादायक कचऱ्याच्या प्रमाणाचा महिनानिहाय तपशील सादर करावा.
* ज्या जागी कचरा टाकण्यात आला आहे, ती जागा जशी होती त्या स्थितीत आणण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.