धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघात अटीतटीची लढत

दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला : सात उमेदवारांकडून प्रचाराला वेग; भाजप-मगोची कसोटी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th December, 11:32 pm
धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघात अटीतटीची लढत

पेडणे : धारगळ जिल्हा पंचायत (Dhargal Zilla Panchayat) मतदारसंघात होऊ घातलेली निवडणूक भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) आणि मगोचे आमदार जीत आरोलकर (Jeet Arolkar) या दोन्ही आमदारांची कसोटी घेणारी ठरणार आहे. भाजप-मगो युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांच्या प्रचारात दोन्ही आमदारांनी पूर्ण ताकद पणाला लावली असून, प्रचारादरम्यान प्रतिसाद मिळत असला तरी ही निवडणूक एकतर्फी न होता, अटीतटीची होणार असल्याचे चित्र आतापासूनच स्पष्ट झाले आहे.

ही निवडणूक भाजप-मगो युुतीबरोबरच अपक्ष उमेदवार म्हणून असलेले ज्ञानेश्वर शिवजी त्यांचे समर्थक देवेंद्र प्रभुदेसाई गोवा फॉरवर्डचे उमेदवार अनिकेत साळगावकर त्यांचे नेते दीपक कलंगुटकर यांनाही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत जे उमेदवार विजयी होतील त्यावरून पुढील राजकीय भवितव्य मजबूत होण्यास मदत होईल. त्यासाठी आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर गोवा फॉरवर्ड उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कलंगुटकर पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसई यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे समर्थक विजयी होण्यासाठी हे नेते रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येते.
दुसऱ्या बाजूने अपक्ष उमेदवार असलेले रामा नाईक यांनीही प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊन त्यांच्या सोबत युवाशक्ती कार्यरत असल्याचे चित्र दिसते. तर आपचे उमेदवार अॅड. प्रसाद शहापूरकर यांचे कार्य पूर्ण पेडणे तालुक्यातील जनतेला माहीत आहे. तुये पंच उदय मांद्रेकर यांनीही आपले भवितव्य घडवण्याच्या नजरेतून मतदारांचा कौल आपल्याच बाजूने असेल, असा दावा करत त्यांनी रिंगणात उडी घेतली आहे. आरजीचे उमेदवार म्हणून तुये पंच अनिल हरमलकर या रिंगणात आहेत.
यंदा सर्वसाधारण जागेमुळे चुरस वाढली
गत निवडणुकीत हा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव होता, परंतु यंदा पेडणे तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी धारगळ हा एकमेव मतदारसंघ सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये भाजप-मगो युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर, गोवा फॉरवर्डचे अनिकेत साळगावकर, आपचे अॅड. प्रसाद शहापूरकर, आरजीचे अनिल हरमलकर आणि अपक्ष ज्ञानेश्वर शिवजी, रामा नाईक व उदय मांद्रेकर हे उमेदवार रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक अटीतटीची होणार आहे.