अधिकारी व इतरांची चौकशी सुरू असल्याने दंडाधिकारी समितीने मागितला अधिक वेळ; सरपंचासह अनेकांची चौकशी पूर्ण

पणजी : गोव्यातील बागा-हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमधील भीषण दुर्घटना प्रकरणी अधिकारी तसेच इतर संबंधितांची चौकशी सुरू असल्यामुळे चौकशी अहवाल सादर होण्यास विलंब होणार आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने दंडाधिकारी समितीला एक आठवड्याचा अवधी दिला होता, मात्र चौकशी पूर्ण न झाल्याने अहवाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दंडाधिकारी समितीने हडफडेचे सरपंच रोशन रेडकर, जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांची चौकशी केली आहे. कागदपत्रे आणि परवान्यांची पडताळणी तसेच संबंधितांची चौकशी अद्याप सुरू असल्याने अहवाल सादर होण्यास थोडा विलंब होईल, अशी माहिती दंडाधिकारी अंकित यादव यांनी दिली.
निलंबित अधिकाऱ्यांचीही चौकशी
या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो यांचीही चौकशी करण्यात आली आहे. परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्याकडून इतर माहिती घेणे सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच चौकशी अहवाल सादर करणे शक्य होईल, असे दंडाधिकारी अंकित यादव यांनी स्पष्ट केले.
२५ जणांचा बळी
गेल्या शनिवारी रात्री हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या क्लबला आग लागल्याने २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, त्यांनी तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, तत्कालीन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो आणि पंचायतीचे तत्कालीन सचिव तुळशीदास बागकर यांना तातडीने निलंबित करण्याची कारवाई केली होती.