चौकशी करून पेपर सेटरवर कारवाई करण्याची मागणी

पणजी : गोवा शिक्षक पात्रता चाचणीत (जीटीईटी) (GTET) कोकणी (Konkani) विषयाच्या एका प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रश्नासाठी जो परिच्छेद दिला होता; त्याच्या भाषेलाही (Language) हरकत घेण्यात आली आहे.
हा परिच्छेद महिलांची बदनामी करणारा असल्याचा दावा कोंकणी राखणदार मंचाचे अध्यक्ष प्रकाश नायक यांनी केला आहे. प्रश्नपत्रिका तपासून कारवाई करण्याचा विचार होणार; असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, शिक्षण सचिव यांनी दखल घेऊन प्रश्नपत्रिका काढलेल्याची चौकशी करावी, अशी मागणी कोंकणी राखणदार मंचने केली आहे. गोवा शिक्षक पात्रता चाचणी (जीटीईटी) ९ व १० डिसेंबरला झाली. गोवा शालांत मंडळातर्फे आयोजन करण्यात येते. राज्यातील ४ हजारांवर उमेदवारांनी ही परीक्षा दिली. आरटीई कायदा लागू झाल्यानंतर भरती झालेल्या शिक्षकांसहीत शिक्षक पदासाठी अर्ज करणारे ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी जीटीईटी सक्तीची आहे. बुधवारी १० डिसेंबरला कोकणीचा पेपर झाला. एक परिच्छेद देऊन त्यावर आधारीत प्रश्न पेपरात विचारला होता. परिच्छेद खालील प्रमाणे आहे.
विशाल पारकार नावाच्या मनशाकडेन लग्न जाल्यार लिनाक तीन वर्सां जाल्ली. पुण ताका भुरगे नासले. सुपुल्ल्या जिवाक खेळोवपाची लिनाची उमळशीक वाडत वताली. पुण भुरगे जावपाची कसलीच चिन्नां दिसनासली देखून लिनाक खूब दुख्ख जातालें. ताणे भुरगे जावचे खातीर देवाक आंगवणय केल्लो, पूण व्यर्थ. एक दिस पुण्यांत एका डॉक्टराकडेन चेकींग करूंक गेल्लेकडेन डॉक्टरान थंयच आशिल्ले.........
अशा शब्दांनी या परिच्छेदाची सुरवात करण्यात आली आहे. त्यातील भाषा ही सदोष आहे. तसेच मजकूरही बरोबर नाही; असे प्रकाश नायक यांनी म्हटले आहे. प्रश्नपत्रिका काढलेल्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिक्षकांनीही हरकत घेतली आहे. कोकणी प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा तपासून तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.