
मडगाव : पाटणा वास्को रेल्वेतील (Railway) ३१ प्रवाशांनी अलार्म साखळी (Railway Alarm Chain) ओढून गाडी थांबवली व गाडीतून उतरले. रेल्वे सुरक्षा दलाने संशयितांना अटक केली. न्यायालयाने मुख्य संशयिताला ११०० व इतरांना ६०० रुपये दंड सुनावला व तीन दिवसांची कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, १२७४२ क्रमांकाच्या पाटणा ते वास्को एक्स्प्रेस या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी १ डिसेंबर रोजी मडगाव ते थिवी या मार्गादरम्यान करमळीनजीक अनधिकृतपणे अलार्म साखळी ओढून गाडी थांबवली व गाडीतून खाली उतरले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने रेल्वेची साखळी ओढून बेकायदा गाडी थांबणाऱ्या मुख्य संशयितासह ३१ जणांना ताब्यात घेतले. रेल्वे कायद्याच्या कलम १४१, १४५ आणि १४७ अंतर्गत केलेल्या गुन्ह्यासाठी अटक करत मडगाव प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने मुख्य संशयिताला ११०० रुपये आणि उर्वरित संशयितांना ६०० रुपये दंड ठोठावला. तसेच ३ दिवसांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली.