सांताक्रूझच्या दिव्यांग वृद्धेची हृदयद्रावक व्यथा; ‘ड्रॅग’ने लक्ष वेधताच सरकारी अधिकाऱ्यांची धाव

पणजी : सरकारी दुर्लक्ष उघड करणारी सांताक्रूझ येथील दिव्यांग वृद्ध महिला कमला नाईक यांची व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. ही महिला फक्त नावापुरती जिवंत आहे. कोणतीही ओळखपत्रे आणि निवारा नसल्यामुळे या महिलेचे अस्तित्व कागदोपत्री संपुष्टात आले आहे. आधी पोटच्या मुलांनी तिला सोडले, आता सरकारी यंत्रणांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले आहे. या महिलेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी गोवा दिव्यांग हक्क संघटनेचे (ड्रॅग) अध्यक्ष आवेलीनो डिसोझा यांनी केली आहे.
मूलभूत हक्कांपासून वंचित
कमला नाईक यांच्याकडे आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज नाहीत. राहण्यासाठी धड निवारा नसल्यामुळे त्यांचे जीवन अतिशय कठीण झाले आहे. वृद्धपणामुळे आणि अपंगत्वामुळे कंटाळून त्यांच्या पोटच्या मुलांनीच त्यांना बेवारस सोडून दिले आहे. कमला नाईक यांची ही व्यथा पाहून ‘ड्रॅग’ संघटनेने संताप व्यक्त केला असून, सरकारने तत्काळ या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
‘ड्रॅग’ने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सांताक्रूझ पंचायत आणि स्वयंपूर्ण मित्रांविरुद्ध राज्य दिव्यांग आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. स्थानिक पंचायतीने या महिलेकडे दुर्लक्ष करून भेदभाव केला असल्याने, कमला नाईक यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा आणि यामागे जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आवेलीनो डिसोझा यांनी केली आहे.
डिसोझा म्हणाले, ही एक साधी गोष्ट नाही. जी व्यक्ती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी आमचे प्रयत्न कसे अपयशी ठरतात, हे प्रकरण दाखवते. कमला नाईक यांची परिस्थिती सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षाचे मोठे उदाहरण आहे.
यावेळी स्वयंपूर्ण मित्र, पंचायत सचिव, स्थानिक बीएलओ, समाज कल्याण अधिकारी, नागरिक पुरवठा अधिकारी, कॅनरा बँकेचे अधिकारी आणि ‘ड्रॅग’चे अध्यक्ष उपस्थित होते.
कायदेशीर परिणामाचा इशारा
भविष्यात दिव्यांग व्यक्तींविरुद्ध दुर्लक्ष झाल्यास त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही‘ड्रॅग’ने दिला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कमला नाईक यांची ओळख पटवून देणारी कागदपत्रे तयार करावीत आणि त्यांना आवश्यक ती मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांनी तत्काळ केली मदत
‘ड्रॅग’ संघटनेने तक्रार केल्यानंतर लगेचच सरकारी अधिकाऱ्यांनी कमला नाईक यांची कालापूर येथील त्यांच्या घरी भेट घेतली. तपासणीत त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, परंतु ते सक्रिय मोबाईल नंबरशी लिंक नाही, हे उघड झाले. अधिकाऱ्यांनी कमला यांना आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करण्यासाठी मदत केली. तसेच, त्यांच्याकडे समाज कल्याण विभागाने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि कॅनरा बँकेत खाते असल्याचेही आढळून आले.