सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या सुविधा

माजी आरोग्य सभापतीसह काढलेल्या मोर्चाला नागरिकांचा प्रतिसाद


23rd November 2017, 04:54 am

वार्ताहर। | गोवन वार्ता
सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सोई सुविधांमुळे कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेबाबत सामाजिक कार्यकर्ते व माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी त्यांनी तहसीलदार सतिश कदम यांना निवेदन सादर करताना येत्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बैठक बोलावून आरोग्य यंत्रणा सुधारावी अन्यथा पुन्हा मोठे आंदोलन उभारू, अशा इशारा दिला.
दरम्यान, भाजप प्रदेश चिटणीस यांनी या मोर्च्याला भेट देत मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन यावेळी तळवणेकर व शिष्टमंडळाला दिले. सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात तापसरीने थैमान घातले असताना आत्तापर्यंत सतरा जणांचे बळी यात गेले आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात पुरेशी यंत्रसामुग्री व डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णावर योग्य उपचार होत नाही. यासाठी मंगेश तळवणेकर, भाई देऊलकर, अतुल माणकेश्वर आदींनी आरोग्य यंत्रणेविरोधात प्रांतकार्यालयावर मोर्चा काढण्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी येथील विठ्ठल मंदिरकडून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी मोर्चात सामील झालेल्या बांंधवाना तळवणेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शहरातून हा मोर्चा प्रांतकार्यालयावर काढण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, भाई देऊलकर, अतुल माणकेश्वर, कारिवडे पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळूसकर, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माडखोल सरपंच संजय शिरसाट, कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, गजानन सातार्डेकर, राजन राऊळ, गुरुनाथ गावकर, विजय हरमलकर आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी तळवणेकर म्हणाले, येथील उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर हे आरोग्य यंत्रणा सुधारण्यात अपयशी ठरले आहेत. सद्यस्थित रुग्णालयात पाच डॉक्टरची पदे रिक्त आहेत. तर यंत्र सामुग्री अपुरी आहेत. अशात दाखल झालेल्या रुग्णांना तात्काळ योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या पंधरा दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या शिष्टमंडळाशी बैठक बोलावून तात्काळ रुग्णालयातील समस्या सोडवाव्यात, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे तळवणेकर यांनी सांगितले.
बोअरवेलचा प्रश्न सोडवा
उपजिल्हा रुग्णालयाला ऐन उन्हाळ्यात भेडसावणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेली बोअरवेल मारण्यात गेली दोन वर्षे टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित विभाग यात जाणूनबुजून खो घालत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरोबर हा प्रश्नही गंभीर असून येत्या चार दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास संबंधितांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही तळवणेकर यांनी दिला आहे.