हजारो रुपयांचे कपडे व वीज उपकरणांचे नुकसान

म्हापसा : येथील बाजारपेठेतील मेसर्स मालसन्स शूज या दुकानाचा भाग असलेल्या डिलक्स कलेक्शन मेन्स अॅण्ड किड्स वेअर या कपड्यांच्या दुकानाला बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
दुपारी साधारण १२.२५ वाजता दुकानाच्या पोटमाळ्यावरून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचार्यांनी तातडीने दुकानाबाहेर धाव घेतली आणि अग्निशमन दलाला कळविले. दुपारी १२.२७ वाजता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रसंगावधान राखत कर्मचार्यांनी काही माल सुरक्षितस्थळी हलवला. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेऊन पिळर्ण व पर्वरी अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली होती. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच म्हापसा दलाने आग नियंत्रणात आणली. धुरामुळे आत प्रवेश करणे कठीण असल्याने दलाच्या जवानांनी दुकानाच्या छतावरून पोटमाळ्याच्या खिडक्या फोडल्या आणि पाण्याचा फवारा मारला. तसेच ऑक्सिजन सिलिंडरच्या सहाय्याने आत प्रवेश करून अधिकारी गणेश गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली फोमचा वापर करीत अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली.
बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा वाहने पार्क असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. ही वाहने हटवून गाडी आत नेल्यानंतरच मदतकार्य सुरू करता आले. दुकानाच्या पोटमाळ्यावरील सुमारे ३० ते ४० टक्के कपड्यांचा माल व काही वीज उपकरणांचे नुकसान झाले आहे. दुकान मालकाने नुकसानीचे अंदाजपत्र सादर केल्यानंतरच एकूण हानी स्पष्ट होईल, असे स्टेशन अधिकारी गणेश गोवेकर म्हणाले. तसेच प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात फायर इस्टिंग्विशरची सोय करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दुकान मालक तुकाराम माळगावकर यांनी मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता नाकारली. दुकानातील वीज पुरवठा बंद होता, वातानुकुलीत संचही बंद होता. शॉर्ट सर्किट झाल्यास एमसी खाली पडली असती. मात्र तसे घडलेले नाही. ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे ते म्हणाले.