भारताच्या पहिल्या दिवशी ३ बाद ३५९ धावा : गिल, जैस्वालची शतके
लीड्स : तेंडुलकर-अँडरसन मालिकेसह भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. भारताचा नवा कर्णधार शुभमन गिलच्या खांद्यावर टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्याच सामन्यात नवा कर्णधार शुबमन गिलने शतक झळकावले. यशस्वी जैस्वालचे शतक, त्यानंतर शुबमन गिलची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दिवसअखेर ३ बाद ३५९ धावा केल्या.
शुभमन गिलने पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक गमावली आणि संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण भारताच्या फलंदाजांनी लीड्सच्या खडतर खेळपट्टीवर चांगली फलंदाजी केली. राहुल-यशस्वीने ९१ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावत टीम इंडियाला सामन्यात पुढे ठेवले. जैस्वाल बाद झाल्यानंतर गिलने ऋषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरला. गिलने शानदार सुरूवात करत झटपट आपले अर्धशतक झळकावले.
शुभमन गिलने १३९ चेंडूत १४ चौकारांसह १०३ धावा करत आपले शतक पूर्ण केले. यासह तो पदार्पणात शतक झळकावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या खास यादीत आपले नाव नोंदवण्यात यशस्वी ठरला. शुभमन गिलच्या शतकानंतर ऋषभ पंतनेही त्याचं अर्धशतक पूर्ण केले. पंतने ९२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा करत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार गिल १२७ तर पंत ६५ धावांवर नाबाद होता. इंग्लंडतर्फे ब्रायडन कार्सेने एक तर कर्णधार बेन स्टोकने २ गडी बाद केले.
जैस्वालचा विक्रम
दरम्यान, यशस्वी जैस्वालने शतकासह अनेक विक्रम आपल्या नावे केले. ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही देशांमध्ये पहिला कसोटी सामना खेळताना शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. यशस्वी जैस्वाल हा जागतिक क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा पाचवा खेळाडू आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वाल हा इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना हेडिंग्ले येथील लीड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या मैदानावर कसोटी सामन्यात शतक करणारा यशस्वी जैस्वाल पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. याआधी कोणत्याच खेळाडूने असा पराक्रम केला नव्हता.
जैस्वाल-राहुलची विक्रमी भागिदारी
लीड्सच्या मैदानावर राहुल आणि जैस्वाल यांच्या जोडीने कोणतीही विकेट न गमावता ६४ धावांचा टप्पा ओलांडताच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. या जोडीने सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांचा ३९ वर्षांचा जुना विक्रम मोडला. १९८६ मध्ये लीड्सच्या मैदानावर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत या सलामी जोडीने सलामीच्या सामन्यात ६४ धावांची भागीदारी केली होती. आता हा ३९ वर्षे जुना विक्रम यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी मोडला. जैस्वाल आणि राहुल यांच्यातील ही भागीदारी आता लीड्सच्या मैदानावर भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
भारताला मिळाल्या अतिरिक्त ५ धावा
लीड्सच्या मैदानावरील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला अतिरिक्त ५ धावा देण्यात आल्या. ५१व्या षटकात ही घटना घडली. स्टोक्सने या षटकातील पाचवा चेंडू टाकला. जैस्वालने चेंडू खेळला आणि तो दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅरी ब्रुकजवळ गेला. हॅरीने चेंडू लगेच यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. चेंडू विकेटकिपरच्या डाव्या दिशेने थ्रो केला आणि तो चेंडू पकडू न शकल्याने मैदानावर ठेवलेल्या हेल्मेटवर जाऊन हा चेंडू आदळला आणि त्यामुळे इंग्लंडला ५ धावांचा दंड ठोठावला गेला. चेंडू हेल्मेटला लागताच, ब्रूकच्या चुकीमुळे भारताला पाच पेनल्टी धावा मिळाल्यावर रूट डोक्यावर हात ठेवून मैदानात बसला होता.
संक्षिप्त धावफलक :
भारत पहिला डाव : ३ बाद ३५९ : फलंंदाजी: शुभमन गिल नाबाद १२७, ऋषभ पंत नाबाद ६५, गोलंदाजी : बेन स्टोक्स १३ षटकांत ४३ धावा २ बळी
भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात शतक झळकावणारे फलंदाज
१६४* विजय हजारे वि. इंग्लंड, दिल्ली १९५१
११६ सुनील गावस्कर वि. न्यूझीलंड, ऑकलंड १९७६
११५ विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड २०१४
१०२* शुबमन गिल वि. इंग्लंड, हेडिंग्ले २०२५
इंग्लंडमध्ये कसोटीत शतक झळकावणारे भारतीय कर्णधार
मोहम्मद अझरुद्दीन (२)
विराट कोहली (२)
मन्सूर अली खान पतौडी (१)
सौरव गांगुली (१)
शुबमन गिल (१)