कृतिदलाची शिफारस : तिन्ही सल्लागार पुन्हा करणार पाहणी
पणजी : कला अकादमीच्या नाट्यगृहासंदर्भात कृतिदलाच्या शिफारशीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) नियुक्त केलेले रॉजर ड्रेगो (ध्वनी), शीतल तळपदे (प्रकाश यंत्रणा) आणि राजन भिसे (रंगमंच) या आठवड्यात पुन्हा एकदा नाट्यगृहाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या शिफारशींप्रमाणे नाट्यगृहाची कामे हाती घेण्यात येणार आहे. सल्लागारांनी त्रुटी दाखवलेली जी कामे पूर्वीच्या कंत्राटदाराने केली आहेत, त्या कामांचे पैसे त्याच्याकडून वसूल करून घेऊन त्याला काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
नूतनीकरण करण्यात आलेल्या कला अकादमीच्या नाट्यगृहात त्रुटी आढळून आल्यानंतर कृतिदलाच्या शिफारशीनुसार ‘पीडब्ल्यूडी’ने तीन सल्लागारांची नेमणूक केली होती. या सल्लागारांनी काहीच दिवसांपूर्वी सरकारला अहवाल सादर करीत, कला अकादमीत नाटकांसह ‘इफ्फी’ काळात चित्रपटही सादर केले जातात. त्याचा विचार करून संबंधित सल्लागाराने नाटक आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून नाट्यगृहाची रचना केली. परंतु, हे नाट्यगृह चित्रपट प्रसारित करण्याच्या दृष्टीने दर्जेदार आहे. नाटकांसाठी मात्र साऊंड आणि प्रकाश योजना योग्य नाही. त्यामुळे त्यात बदल करण्यात यावे. याशिवाय नाट्यगृहात असलेल्या एसीचा आवाज नाटक सुरू असताना माईकमध्ये जात असल्याने त्याचा फटका अभिनय करणाऱ्या कलाकारांना बसतो. त्यामुळे नाट्यगृहातून एसी हटवून तेथे वेगळ्या प्रकारची व्यवस्था करावी, असेही सल्लागारांनी अहवालात म्हटले होते.
दाेन महिने नाट्यगृह बंद राहणार
हे तिन्ही सल्लागार या आठवड्यात पुन्हा नाट्यगृहाची पाहणी करतील आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने नाट्यगृह बंद ठेवण्याचा विचारही कला अकादमीने सुरू केलेला आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.