साईसुदर्शनचे शतक, शुभमन गिलच्या ९३ धावा
दिल्ली : गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ६० व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर १० विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. दिल्लीने गुजरातला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान १९ षटकांमध्ये एकही गडी न गमावता पूर्ण केले. गुजरातने २०५ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. साईने (१०८) शतकी खेळी केली. तर शुबमनने नाबाद ९३ धावा केल्या. गुजरातने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. तसेच गुजरातच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सनेही प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
शुबमन-साईची ऐतिहासिक भागीदारी
शुबमन आणि साईने या नाबाद द्विशतकी भागीदारीसह इतिहास घडवला. साई आणि शुबमन आयपीएल इतिहासात नाबाद सलामी द्विशतकी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली. या दोघांनी या भागीदारी दरम्यान चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. साईने या खेळीत ६१ चेंडूत ४ षटकार आणि १२ चौकारांसह १०८ धावांची नाबाद खेळी केली. तर शुबमनने ५३ चेंडूमध्ये ७ सिक्स आणि ३ चौकारासह नाबाद ९३ रन्स केल्या.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर केएल राहुलचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. या सामन्यात राहुलने डावाची सुरुवात केली आणि दमदार शतक ठोकले. केएल राहुलने ६० चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील पाचवे शतक ठरले. गुजरातविरुद्ध राहुलने ६५ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. राहुलने १४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. राहुलच्या स्फोटक खेळीमुळे दिल्लीने प्रथम खेळत गुजरातला २०० धावांचे लक्ष्य दिले.
केएल राहुलच्या ८ हजार धावा
या सामन्यात केएल राहुलने ३३ धावा करताच त्याने इतिहास रचला आणि भारतासाठी ८ हजार टी-२० धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनला. या दरम्यान, केएल राहुलने हा विक्रम असलेल्या विराट कोहलीला मागे टाकले. केएल राहुल हा टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा गाठणारा सहावा भारतीय आहे. केएल राहुलने ८००० टी २० धावा पूर्ण करण्यासाठी २२४ डाव घेतले, तर विराट कोहलीने हा टप्पा गाठण्यासाठी २४३ डाव घेतले. यासह, केएल राहुल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये ८ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे बाबर आझम आणि ख्रिस गेल आहेत. या यादीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे, ज्याने २१३ डावांमध्ये ही कामगिरी केली. तर बाबर आझमने २१८ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.