गोव्यात एप्रिलमध्ये १९८ अपघातात २६ जणांचा बळी

उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात जास्त अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
गोव्यात एप्रिलमध्ये १९८ अपघातात २६ जणांचा बळी

पणजी : गोव्यात एप्रिल महिन्यात रस्ते अपघातांची संख्या वाढली असून, यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये राज्यात एकूण १९८ अपघात झाले. मृतांमध्ये १७ दुचाकीस्वारांचा आणि चार मागे बसलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या महिन्यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८ अपघातांपैकी २४ अपघात प्राणघातक (फॅटल) आहेत. याशिवाय १५ गंभीर अपघात, ४३ किरकोळ अपघात आणि ११६ अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. २६ मृतांमध्ये १७ दुचाकीस्वार, चार दुचाकीवर मागे बसलेले आणि पाच पादचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातांमध्ये १७ जण गंभीर जखमी झाले, तर ७६ जणांना किरकोळ दुखापत झाली.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात अपघातांची संख्या जास्त नोंदवण्यात आली आहे. उत्तर गोव्यात ८३ अपघात झाले, तर दक्षिण गोव्यात ११५ अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांची संख्या जास्त असल्याने दक्षिण गोव्यात १४, तर उत्तर गोव्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गोव्यात आठ जण गंभीर जखमी झाले, तर १८ जणांना किरकोळ दुखापत झाली. याउलट, दक्षिण गोव्यात ९ जण गंभीर जखमी झाले, तर ५८ जणांना किरकोळ दुखापत झाली.
दुचाकीस्वारांचे मृत्यूंचे प्रमाण उत्तरेत जास्त
विशेष म्हणजे, दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्राणघातक (फॅटल) अपघातांची संख्या समान (प्रत्येकी १२) असली तरी, दुचाकी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण उत्तर गोव्यात अधिक आहे. उत्तर गोव्यात नऊ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर दक्षिण गोव्यात ही संख्या आठ आहे. यामुळे राज्यात दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.