सिद्दिकीला पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाचा नकार

सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd March, 12:03 am
सिद्दिकीला पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाचा नकार

पणजी : जमीन व्यवहार प्रकरणात अटक केलेला मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान गुन्हा शाखेच्या कोठडीतून पसार झाला होता. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या पोलिसाचा तपास पूर्ण झाल्याचे समोर येत आहे. याची दखल घेऊन सिद्दिकी याला पलायन प्रकरणात पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ईर्शाद आगा यांनी दिला. 

या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, जमीन व्यवहार प्रकरणातील संशयित सिद्दिकी खान चार वर्षांपासून फरार होता. गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हुबळीमधून अटक केली होती. सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. त्यासाठी त्याने तत्कालीन आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक याची मदत घेतली होती. 

गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम (केरळ) पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयाने सिद्दिकी याला प्रथम पोलीस कोठडी दिली होती. त्यावेळी त्याला वैद्यकीय उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याच दरम्यान जुने गोवा पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून त्याची पोलीस कोठडीची मागणी केली. 

या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून सिद्दिकी याच्यासह बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक आणि हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली यांच्याविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 

दरम्यान वरील अर्ज प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, जुने गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून सिद्दिकीला पोलीस कोठडी देण्यास नकार दिला. या संदर्भात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला.