सुरुवातीला अडीच हजार विद्यार्थ्यांना देणार आहार
पणजी : विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्यासाठी निवड झालेली बंगळुरु येथील ‘अक्षयपात्र’ ही स्वयंसेवी संस्था येत्या १ एप्रिलपासून सेवा देण्यास सुरुवात करणार आहे. ही संस्था सुरुवातीला राज्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
प्रलंबित बिले तसेच इतर काही कारणांमुळे काही स्थानिक स्वयंसहाय्य गटांनी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्यास नकार दर्शवला होता. त्यामुळे सरकारने यासाठी निविदा जारी केल्या होत्या.
त्यानुसार ‘अक्षयपात्र’, ‘स्त्रीशक्ती’, ‘घनश्याम सेवा समिती’, ‘केंद्रीय भंडार मुंबई’ आणि ‘नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स’ या पाच स्वयंसेवी संस्था पात्र ठरल्या होत्या. त्यातून अखेर बंगळुरूतील ‘अक्षयपात्र’ची निवड करण्यात आली होती.
निवड होऊन वर्ष उलटले तरी ‘अक्षयपात्र’ने अद्याप आपली सेवा सुरू केलेली नाही. पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्यासाठी किचन तसेच इतर कामांसाठी काही महिन्यांची मुदत संस्थेने मागितलेली होती. त्यानुसार शिक्षण खात्याने संस्थेला मुदतही दिलेली होती.
अखेर संस्थेने आता येत्या १ एप्रिलपासून अडीच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्याचे निश्चित केलेले आहे. कोणकोणत्या भागांतील विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’चा माध्यान्ह आहार द्यायचा, याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांत घेण्यात येणार असल्याचेही झिंगडे यांनी सांगितले.