बेकायदेशीर वाहतुकीमुळे गोवा दोडामार्ग येथील नागरिक त्रस्त

धुळीमुळे श्वसनाचे आजार : पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
13th February, 12:27 am
बेकायदेशीर वाहतुकीमुळे गोवा दोडामार्ग येथील नागरिक त्रस्त

गोवा दोडामार्ग येथील मातीच्या रस्त्यावरून अशी अवैध वाहतूक सुरू आहे.

डिचोली :
गोवा दोडामार्ग येथील तिळारी धरणाच्या कालव्यालगतच्या कच्च्या रस्त्यावरून पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून अनधिकृतपणे वाहतूक सुरू आहे. मात्र याचा फटका स्थानिकांना बसतो. रस्त्यावरून अवजड वाहने ये-जा करत असल्याने दिवसभर धूळ उडत असते. त्यामुळे श्वसनाचे आजार जडल्याचे स्थानिकांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोवा दोडामार्ग येथील आरटीओ आणि पोलीस चेकपोस्टला पर्यायी मार्ग म्हणून तिळारी धरणाच्या लगतचा माती​चा रस्ता अनेक वाहनचालक वापरतात. हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी नाही. मात्र येथून बिनदिक्कतपणे बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे येथे घरे असलेल्या स्थानिकांच्या अडचणींत भर पडली आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे येथे धुळीचे लोट उठतात. ही धूळ घरात साचते. त्यामुळे लोकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी पोलिसांसह स्थानिक पंचायत, वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. काही काळापुरता या ठिकाणी अडथळा निर्माण करून वाहतूक बंद करण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा वाहनांची​ वर्दळ सुरू झाल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत.

कायमस्वरूपी गेट बसवा!
दोन्ही चेकनाक्यांवरील अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन या रस्त्याने बेकायदेशीर वाहतूक केली जाते. संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. मातीच्या रस्त्यावर कायमस्वरूपी गेट बसवून अशा वाहनांना प्रतिबंध करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

हेही वाचा