१४ पोलीस स्थानकांना रक्तदाब, साखर, बॉडी मास इंडेक्स तपासण्याची यंत्रे प्रदान
पणजी : उत्तर गोव्यातील १४ पोलीस स्थानकातील पोलिसांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली. आयएमए गोवा, वायनार आणि गोवा पोलीस आयोजित स्वस्थ पोलीस - सशक्त पोलीस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक अलोक कुमार, पोलीस उमहानिरीक्षक अजय शर्मा, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व अन्य अधिकारी उपस्थित होते.
डॉ. साळकर यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत १४ पोलीस स्थानकांना रक्तदाब, रक्तातील साखर, बॉडी मास इंडेक्स तपासण्याची यंत्रे देण्यात आली आहेत.
दिवसाला एका पोलीस स्थानकातील दोन पुरुष तर एक महिला पोलिसांची तपासणी करून त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे.
या प्रक्रियाद्वारा महिन्याला साधारणपणे एका पोलीस स्थानकातील १०० पोलिसांची माहिती मिळणार आहे. मार्च महिन्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली.
साळकर म्हणाले, पोलिसांनी केलेल्या नोंदीचे छायाचित्र आयएमएला पाठवावे. आम्ही त्याची नोंद संगणकावर करून ठेवणार आहोत. आमच्याकडे एका वर्षांच्या नोंदी उपलब्ध झाल्यावर आम्हाला पोलिसांना कोणत्या शारीरिक समस्या आहेत याची थोडी माहिती मिळणार आहे.
मधुमेह, रक्तदाबाचे किती रुग्ण आढळले हे आम्हाला समजणार आहे. यानंतर त्यांना कोणते उपचार द्यायचे हेही आम्ही ठरवणार आहोत. या प्रक्रियेत काही अडथळे आल्यास आयएमएचे डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
किमान एक तास तरी व्यायाम करा !
पोलीस महासंचालक अलोक कुमार म्हणाले की, व्यायाम करणे किंवा तंदुरुस्त राहणे हे एक चांगले व्यसन आहे. शारीरिक आरोग्य चांगले असेल तर मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.
प्रत्येक पोलिसाने निवृत्त होईपर्यंत किमान एक तास तरी व्यायाम करावा. गोव्यातील प्रदूषण विरहित वातावरणात व्यायाम करणे आणखी चांगले आहे. गोवा पोलिसांना भारतातील सर्वात तंदुरुस्त आणि कार्यक्षम पोलीस बनवण्याचे आमचे ध्येय आहे.
कायदा हातात घेऊ नये :
पोलीस महासंचालक म्हणाले की, पर्यटकांनी गोवा शांततापूर्ण राज्य आहे हे समजून घ्यावे. पर्यटक तसेच पर्यटनाच्या संबंधित सर्व घटकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.