बसची फेरी अनियमित असल्याने कामावर जाणाऱ्यांची धांदल
प्रसारमाध्यमांना माहिती देताना दोडामार्ग तालुक्यातील प्रवासी.
पणजी : पणजीहून घोटगेवाडी (ता. दोडामार्ग) येथे ये-जा करणारी कदंब बस अनियमित असल्यामुळे तसेच या बसची वेळ बदलल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामानिमित्त गोव्यात येणाऱ्यांना याचा फटका बसत असून बसची वेळ पूर्ववत करावी, तसेच बस नियमित सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
या संदर्भात पर्वरीतील कदंब डेपोच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन प्रवाशांनी आपली व्यथा मांडली. ही बससेवा गेली ३५ ते ४० वर्षे तिळारीमार्गे नियमितपणे सुरू आहे. पणजीहून संध्याकाळी सुटणाऱ्या या बसचा शेवटचा थांबा घोटगेवाडी येथे आहे. म्हापसा, अस्नोडा, कासारपालमार्गे ही बस जाते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यासह गोव्यातील अनेक कामगारांना या बसचा मोठा आधार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता ही बस घोटगेवाडीहून पणजीला यायला निघते. या बसमुळे कामगारांना कामावर वेळेत पोचता येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बस अचानकपणे सकाळी ७ वाजता सुटत असल्यामुळे कामावर वेळेत पोचणे शक्य होत नाही. साहजिकच कामगारांची कुचंबणा होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी काही कामगारांनी पर्वरीतील डेपो व्यवस्थापकांची भेट घेऊन व्यथा मांडली. मात्र त्यांना पर्वरीतील मुख्य कार्यालयात जाण्याची सूचना करण्यात आली.
बस न आल्यास भुर्दंड...
गेल्या काही दिवसांपासून घोटगेवाडी कदंब बस अनियमितपणे येते. त्यामुळे कामानिमित्त गोव्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. नेहीम प्रवास करणाऱ्यांकडे कदंबचे पास असून त्याचा उपयोग होत नाही. कदंब आली नाही, तर दर दिवशी खासगी वाहनाने १०० ते १५० रुपये खर्च करून जावे लागते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कदंबची वेळ आणि फेरी पूर्वीप्रमाणे नियमित करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.