अवघ्या तीन महिन्यांसाठी पटकावले सरपंचपद

मांद्रे सरपंचपदी राजेश मांद्रेकर यांची बिनविरोध निवड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th February, 06:39 pm
अवघ्या तीन महिन्यांसाठी पटकावले सरपंचपद

पेडणे : तीन महिन्यांसाठी सरपंचपद वाटून घेण्याच्या अलिखित करारानुसार, मांद्रे पंचायतीच्या सरपंचपदी राजेश मांद्रेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागच्या तीन महिन्यांसाठी सरपंच म्हणून मिंगेल उर्फ रोजा फर्नांडिस यांची निवड झाली होती. त्या अंतर्गत अलिखित करारानुसार मिंगेल फर्नांडिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पुढच्या तीन महिन्यांसाठी हे पद रिक्त करण्यात आले.
त्यानुसार १० रोजी मांद्रे पंचायत मंडळाची खास बैठक होऊन सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी सरपंच पदासाठी राजेश मांद्रेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी उपसरपंच तारा हडफडकर पंच सदस्य चेतना पेडणेकर, पंच सदस्या संपदा आजगावकर, पंच महेश, पंच किरण सावंत, पंच रॉबर्ट फर्नांडिस आधी पंच सदस्य उपस्थित होते. तर माजी सरपंच तथा विद्यमान पंच अॅड. अमित सावंत, बाळा उर्फ प्रशांत नाईक, मिशेल फर्नांडिस हे तीन पंच गैरहजर राहिले.
तीन-तीन महिन्यांसाठी पुढील सरपंच बसवण्यासाठी सत्तारूढ गटामध्ये अलिखित करार झाला होता. या तीन महिन्यांत पंचायत क्षेत्राचा नवनिर्वाचित सरपंचांना कशा प्रकारे विकास करता येईल? त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील. हाही आता एक प्रश्न उभा राहिला आहे. संगीत खुर्चीच्या या खेळामुळे अलिखित करारानुसार तीन-तीन महिन्यांसाठी सरपंच पद बदलणे म्हणजे विकासाला कुठेतरी ब्रेक लागतो की काय, अशीही शंका निर्माण होत आहे.

पंच सदस्यांनी विश्वास दाखवून आपल्याला सरपंच पद बहाल केलेले आहे. या पदाच्या कारकिर्दीत पूर्ण पंचायत क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. स्थानिक आमदार जीत आरोलकर आणि सरकारच्या माध्यमातून पंचायत क्षेत्राच्या विकासावर भर दिली जाईल. - राजेश मांद्रेकर, नवनिर्वाचित सरपंच, मांद्रे 

हेही वाचा