सांताक्रूझ : चिंबल येथील ७० बेकायदा बोअर वेल्स आणि विहीरी जलस्त्रोत खात्याच्या रडारवर

संबंधितांना नोटीसा पाठवून पोलिसांच्या सहाय्याने करणार कारवाई : जलस्त्रोत मंत्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th February, 04:35 pm
सांताक्रूझ : चिंबल येथील ७० बेकायदा बोअर वेल्स आणि विहीरी जलस्त्रोत खात्याच्या रडारवर

पणजी : सांताक्रूझ मतदारसंघातील चिंबल परिसरात असलेल्या अनेक बेकायदा बोअर वेल्स आणि विहिरी सध्या जलस्त्रोत खात्याच्या रडारवर आल्या आहेत. संबंधित बोअर वेल्स आणि विहीरींच्या मालकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून येत्या काळात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत सदर विहिरी आणि बोअर वेल्स बंद करण्यात येतील अशी माहिती, जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

 एकट्या चिंबल परिसरातच सुमारे ६०-७० विहिरी असल्याची रीतसर तक्रार त्यांच्याकडे शुक्रवारी आली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले.  ही माहिती समोर येताच जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी यांनी संबंधितांना नोटीसा जारी केल्या आहेत.  तसेच सहाय्यक अभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांना या सर्व विहीरींची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशीही माहिती शिरोडकर यांनी दिली आहे. 

 हे दोन्ही अधिकारी सदर ठिकाणी जात पाहणी करतील. नंतर काही चुकीचे आढळून आल्यास पोलिसांच्या मदतीने पाण्याची जोडणी तोडत बोअर वेल्स किंवा विहिरी सील करण्यात येतील. ज्यांनी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून बोअर मारल्या असतील त्यांना कायद्यानुसार ५-१० लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. ज्यांना बोअर वेल किंवा विहीरीची गरज असेल त्यांनी कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करत संबंधित खाते आणि अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घ्यावी, असे ते म्हणाले. 

दरम्यान, एखादा अधिकारी काही संपूर्ण दिवस फिरून बेकायदेशीर बाबींवर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे स्थानिकांनी याकामी मदत करणे गरजेचे आहे. असे अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना शिरोडकर म्हणाले. तरीही राज्यात एकूण किती बोअर वेल्स आहेत आणि आतापर्यंत खात्याच्या अधिकारी आणि अभियंत्याच्या नजरेखाली या गोष्टी का आल्या नाहीत याचीही मीमांसा केली जाईल, एकंदरीत बेकायदेशीर बोअर आणि विहीरींचा आकडा समोर येताच पुढील कारवाई करू, असे सरतेशेवटी मंत्री शिरोडकर  म्हणाले. 


हेही वाचा