गोवा : नवीन देवस्थान समित्यांनी सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी: मुख्यमंत्री

नवनिर्वाचित देवस्थान समित्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th February, 03:53 pm
गोवा : नवीन देवस्थान समित्यांनी सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी: मुख्यमंत्री

पणजी : समाजाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक घडी व्यवस्थित ठेवण्यात देवस्थान समित्यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. नवीन समित्यांनी देवस्थानमार्फत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

रविवारी राज्यातील देवस्थान समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. काही किरकोळ अपवाद वगळता बहुतांश देवस्थान समित्यांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच देवस्थान समिती सदस्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे.

देवस्थानचे व्यवस्थापन तसेच दैनंदिन कामकाज सांभाळण्याचे कार्य देवस्थान समित्यांचे आहे. देवस्थानच्या योग्य व्यवस्थापनाबरोबर भाविकांना योग्य त्या सुविधा पुरवणे गरजेचे आहे . समाजात आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक एकोपा टिकवून ठेवण्यात सुद्धा देवस्थान समित्यांना महत्वाची भूमिका वठवावी लागणार आहे. सांस्कृतिक केंद्र म्हणून देवस्थानाची प्रतिमा तयार व्हावी. आपल्या मंदिरांचा समृद्ध वारसा पर्यटकांपर्यंत पोचविण्याचे काम देवस्थान समित्यांनी करायला हवे, यासाठी आध्यात्मिक पर्यटनास चालना द्यावी, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.


हेही वाचा