भारतीय नागरिक सुरक्षा संहितेखाली जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
पणजी : दक्षिण गोव्यातील नागरिकांनी पोलीस ठाण्याला भाडेकरूंची माहिती कागदपत्रांसह देण्यापूर्वी कोणालाही भाडेकरू म्हणून ठेवू नये, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ खाली जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशाचे पालन न केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ खाली कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
प्रत्येकाला व्यक्तिगत नोटीस देणे शक्य नसल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. भाडेकरू पडताळणी कायद्याखाली काही दिवसांपूर्वी भाडेकरूंची ओळखपत्रांसह माहिती देण्याचा आदेश सरकारने दिला होता. भाडेकरूंची माहिती न दिल्यास दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. १ डिसेंबरपासून दंड लागू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
या दरम्यान, एटीएमबाहेर सुरक्षारक्षक नियुक्त करण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना दिला आहे. भारतीय न्याय संहितेखाली हा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.