बार्देश : वेलिंगकरांना तडीपार करा; ख्रिस्ती बांधवांचे म्हापसा पोलिसांना निवेदन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th October, 05:09 pm

म्हापसा :  सुभाष वेलिंगकर यांनी 'गोयंच्या साहेबा'संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ख्रिस्ती बांधव क्षुब्ध आहेत. तसेच डिसेंबरमध्ये होणार्‍या झेवियरांच्या अवशेष प्रदर्शन सोहळा संपेपर्यंत वेलिंगकरांना तडीपार करावे, अशी मागणी ख्रिस्ती बांधवांनी म्हापसा पोलिसांना निवेदन सादर करून केली आहे.

वेलिंगकरांच्या विधानामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करीत सोमवारी ७ रोजी दुपारी म्हापसा व परिसरातील ख्रिस्ती तसेच इतर धर्मातील बांधवांनी म्हापसा पोलीस स्थानकावर मोर्चा आणला व नंतर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर केले.

जॉन लोबो, राहुल सिक्वेरा, मिलाग्रीस डिसोझा, मेल्विन व्हिएगस, जॉन डिसोझा, बेनी आरावझो, एडविन फोन्सेका, फ्रान्सिस फर्नांडिस, मारिया रॉड्रिगज, संजय बर्डे, सितेश मोरे, अनिल केरकर व इतर मोठ्या संख्येने ख्रिस्ती व इतर उपस्थित होते.

फ्रान्सिस फर्नांडिस म्हणाले की, सुभाष वेलिंगकार यांनी जे शब्द सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल जे उद्गार काढले, ते स्वीकार्य नाही. असे वक्तव्य करुन वेलिंगकर हे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करुन फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांना तत्काळ अटक करावी. तसेच डिसेंबरमधील सेंट फ्रान्सिस झेवियरांच्या अवशेष प्रदर्शन सोहळा होईपर्यंत, त्यांना गोव्यातून तडीपार करावे, अशी मागणी त्यांनी केली.

जॉन लोबो म्हणाले की, वेलिंगकरांनी जे दावे केले आहेत, ते वास्तवात चुकीचे आहेत. गोव्यात जातीय तेढ आणि शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील इतर ज्वलंत विषयांपासून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा हा डाव दिसतो. यात जमिनींचे होणारे अतिक्रमण आणि भू-माफियांच्या विषयाला बगल देण्याचे हे कट कारस्थान वाटते. वेलिंगकरांची मानसिक चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा