तिसवाडी: निवारा गृहांसाठीच्या अनुदानात ४० टक्के वाढ

मुख्यमंत्र्यांवर मर्यादा असूनही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला- डोनाल्ड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd October, 12:37 am
तिसवाडी: निवारा गृहांसाठीच्या अनुदानात ४० टक्के वाढ

पणजी : महिला व बाल संचालनालयाने आमच्या मागण्या पूर्ण करत निवारा गृहांसाठीच्या अनुदानात ४० टक्के वाढ केली आहे. सध्या प्रति व्यक्ती ९,७०० एवढे रुपये अनुदान मिळत असून सध्याची महागाई लक्षात घेता पैशांचा पुनर्विचार करावा अशी आमची मागणी असल्याचे स्ट्रीट प्रोव्हिडन्स एनजीओचे प्रमुख डोनाल्ड फर्नांडिस यांनी सांगितले.

गेल्या सहा वर्षांपासून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अनुदान वाढवण्याची मागणी करत आहोत. २००७ पासून प्रति व्यक्ती केवळ चार हजार मिळत होते. या रकमेत वाढ करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आमच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभारी असल्याचे डोनाल्ड म्हणाले.

आता २०२४-२५ साठी आम्हाला निवारा गृहांमधील सहा महिलांच्या गटातील प्रत्येक महिलेसाठी ९,७०० मिळतात. पण वरवर पाहता ४ हजार हे २००७ च्या महागाई दरावर आधारित होते. पण हे ९७०० रु. हे २०१२ च्या महागाई दरावर आधारित आहे. प्रति व्यक्तीमागे आम्हाला २० हजार पर्यंत खर्च असून त्यात वाढ करण्याची मागणी डोनाल्ड यांनी केली होती.

संचालकांसह मुख्यमंत्र्यांचेही आभार- डोनाल्ड
माजी संचालिका संगीता परब यांनी पहिली फाईल मंजूर केली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या फ्रान्सिस्को ऑलिव्हेरा यांनी तसेच आता नवीन संचालक म्हणून आलेल्या मॅन्युएल बॅरेटो यांनीही याचा पाठपुरावा केल्याबद्दल आम्ही तिघांचेही आभार मानतो. आम्ही मुख्यमंत्र्यांची या विषयासंबंधी भेट घेतल्यावर त्यांनी आमची मागणी गांभीर्याने घेतली. मुख्यमंत्र्यांवर मर्यादा असूनही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे डोनाल्ड यांनी सांगितले. 

हेही वाचा