पेडणे : ‘मोपा’वर स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन!

कासारवर्णे पंचायतीसमोर धरणे आंदोलनात इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd October, 12:29 am
पेडणे : ‘मोपा’वर स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन!

पेडणे : पेडणे तालुक्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत स्थानिकांच्या बाबतीत अन्याय झालेला आहे. युवकांना रोजगार आणि भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यात सरकार अयशस्वी ठरले असून स्थानिकांना जर रोजगारच उपलब्ध करून दिला जात नसेल तर मोपा विमानतळ हवाच कशाला? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

मोपा पीडित जन संघटनेच्या माध्यमातून १ ऑक्टोबर रोजी पेडणे मतदार संघातील मोपा येथील पिडीत शेतकरी आणि बेकार युवक युवतींचा जटिल प्रश्न घेऊन कासारवर्णी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या धरणे आंदोलनाला गोव्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.

काँग्रेस गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी यावेळी सरकारवर टीका केली. सरकारने गोवेकरांची दिशाभूल केली आहे. २०११ साली या मनोहर पर्रीकर सरकारने गोव्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन यात्रा काढली. मात्र सद्यस्थितीत पेडण्यात गॅम्बलिंग झोन आणि वेश्या व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचाच पक्षाचा प्रयत्न असल्याची टीका पाटकर यांनी यावेळी केली.

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर म्हणाले, मोपा विमानतळावर जीएमआर कंपनी आहे. ती स्थानिकांना नोकऱ्या देण्यास सपशेल अपयशी ठरली असून याचा पूर्ण दोष माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनाच द्यावा लागेल. त्यांनी आजपर्यंत स्थानिकच बेरोजगार युवकांना नोकऱ्यांच्या संधी मिळण्याबाबत कंपनीकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र घेतले नाही.

कासारवर्णे सरपंच अवनी गाड यांनी आपला या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून उदय महाले हे वेगवेगळ्या सामाजिक समस्या आंदोलनाद्वारे सरकारसमोर मांडत असून मोपा विमानतळाबाबत पीडित शेतकऱ्यांना सरकारने न्याय मिळून द्यावा असे आवाहन केले. तसेच जेव्हा कधी उदय महाले आमच्या पंचायतीला हाक मारतील त्या त्यावेळी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, उत्तर काँग्रेस सचिव अॅड. जितेंद्र गावकर, मांद्रे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर, शंकर काणकोणकर, अध्यक्ष कृष्णा नाईक, सामाजिक कार्यकर्ते तथा टॅक्सी असोसिएशनचे भास्कर नारुलकर, कासारवर्णे सरपंच अवनी गाड, वारखंड सरपंच तुळसकर,पेडणे माजी नगराध्यक्ष तथा जमीनदार डॉक्टर वासुदेव देशप्रभू, दीपेश नाईक, मिशन फॉर लोकलचे राजन, गुंडू राऊळ, साक्षी नाईक, वृषाली नाईक, नवनाथ नाईक. संजय आरोदेकर, दिनेश परब, राजन नाईक, पांडुरंग नाईक, ममता नाईक, सविता गावडे, संतोष भाईप, ममता पी. नाईक, सावित्री नाईक, जानकी परब. संजय आरोस्कर आदींनी पाठिंबा दिला.

यावेळी शंकर पोळजी, काणकोणकर ,भास्कर नारुलकर, वारखंड सरपंच तुळसकर, डॉक्टर वासुदेव देषप्रभू आदींनी मनोगत व्यक्त केले.

तीव्र आंदोलन करणार
सरकारने लवकरात लवकर स्थानिक बेरोजगार आणि सुशिक्षित युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनाही रोजगाराबाबत प्राधान्य द्यावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

 न्यायासाठी रस्त्यावर यावे लागते, ही शोकांतिका
मोपा विमानतळावर महाराष्ट्रातले टॅक्सी व्यावसायिक आपला व्यवसाय करतात. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विमानतळासाठी गेल्या आहेत अशा पिडीत शेतकऱ्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. या शेतकरी वर्गाला आणि त्यांच्या समर्थकांना न्यायासाठी रस्त्यावर यावे लागते, ही शोकांतिका आहे- अॅड. जितेंद्र गावकर, काँग्रेसचे नेते 

हेही वाचा