अबुधाबी : येथे आयोजित आयफा अवार्ड्स २०२४ मध्ये सिनेस्टार्सची रेलचेल पहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरातील गाजलेल्या चित्रपटांचा आणि त्यात काम केलेल्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून सर्वोत्कृष्ट चित्रपटापर्यंत आणि विशेष श्रेणींमध्येही पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळाला, तर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटाला ५ पुरस्कार मिळाले.
शाहरुख खानला २०२३ मध्ये आलेल्या 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खानने त्याचा सन्मान करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या पायांना स्पर्श केला आणि ए.आर. रहमान यांना प्रेमाने मिठी मारली.
'ॲनिमल'ने पटकावले ५ पुरस्कार
'ॲनिमल' चित्रपटाला 5 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. IIFA 2024 मध्ये 'ॲनिमल' ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब पटकावला. संदीप रेड्डी वांगा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसलेल्या बॉबी देओलला त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अनिल कपूरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा किताब देण्यात आला. संगीत विभागातही या चित्रपटाने २ पुरस्कारांना गवसणी घालत कमाल केली. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनात 'सतरंगा'ला पहिला पुरस्कार तर दुसरा पुरस्कार 'सर्वोत्कृष्ट गीत' प्रकारात देण्यात आला.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (महिला) श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर राणी मुखर्जीने 'मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे' या चित्रपटातील तिच्या हृदयस्पर्शी भूमिकेसाठी नेक्सा आयफा २०२४ ट्रॉफी जिंकली. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी जीवन गौरव हा पुरस्कार हेमा मालिनी यांना प्रदान करण्यात आला. सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री हिला तिच्या 'फरे' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा किताब मिळाला.