या आठवड्यात काय घडले...वाचा साप्ताहिकीमध्ये!

विधानसभेचे अधिवेशन, विधेयकांवरून आठवडाभर गदारोळ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th August, 11:51 pm
या आठवड्यात काय घडले...वाचा साप्ताहिकीमध्ये!

पणजी : विधानसभेचे अधिवेशन, विधानसभेत तसेच संसदेत येणारी विधेयके, विधेयकांवरून भांडणे आणि विधानसभा संपल्यानंतर आमदार, मंत्र्यांची दिल्लीवारी यामुळे आठवडा गजबजला. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची पदकातील निराशाजनक कामगिरी आणि विनेश फोगटची अपात्रता या आठवड्यातही विशेष चर्चेत होती.


एसटी आरक्षण विधेयक
एसटी समाजासाठी मतदारसंघ आरक्षीत करण्यासाठी गोवा विधानसभा अनुसुचित जमाती प्रतिनिधीत्व मतदारसंघ फेररचना विधेयक २०२४, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत सादर केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकांना मंजुरी दिली. मात्र हे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर ते मंजुरीसाठी चर्चेला येणे अपेक्षीत होते. मात्र ते या अधिवेशनात चर्चेला आले नाही. ते पुढच्या अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी याबाबत निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, विलंबामुळे आरक्षणाला बाधा येऊ शकते.


भाजप पदाधिकाऱ्यांना व्हीप
भाजपचे गोवा प्रभारी आशिष सुद यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की, जो कोणी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील मुद्दे किंवा चर्चेची माहिती बाहेरील कोणालाही देईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सुद यांनी मंत्र्यांना नवीन कायदे आणि धोरणे सादर करण्यापूर्वी पक्षाला सादर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, बैठकांना काही अर्थ उरत नाही. कारण काही लोक बाहेर जाऊन बैठकीत काय झाले ते सांगतात. या गोष्टी कोणी बाहेर काढल्यास त्यांचा माग काढला जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सूद यांनी दिला.


मध्य प्रदेशात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शहापूर गावात गुरुवारी भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाला. सोमवारी श्रावण सुरू होण्यापूर्वी शहापूर गावातील हरदयाळ मंदिरात लहान मुले शिवलिंग बनवत होती. त्याच क्षणी भिंत कोसळली आणि मुले त्या खाली चिरडली. ती भिंत 50 वर्षे जुनी होती.
वादग्रस्त विधेयक अखेर मागे
भाजप कोअर क​मिटी आणि मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्री विश्वजित राणे यांनी नगररचना विभागाचे नवीन जमीन परिवर्तन सुधारणा विधेयक मागे घेतले. नगररचना विधेयकासोबतच क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन दुरुस्ती, महापालिका दुरुस्ती आणि पणजी महानगरपालिका दुरुस्ती विधेयके मागे घेण्यात आली. या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर त्यांना कोणत्याही विभागात किंवा न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद होती. या नगररचना दुरुस्ती विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चेपूर्वी हे विधेयक रद्द करण्याचा निर्णय मंत्र्यांनी घेतला.
पर्वरी महामार्ग बंद राहणार नाही
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पर्वरी महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी येथील वाहतुकीचा दोन ठिकाणचा मार्ग ८ ऑगस्ट ते ७ डिसेंबरपर्यंत वळविण्याची अधिसूचना ‘साबांखा’ने जारी केली होती. मात्र, यावर साधक-बाधक प्रतिक्रिया उमटल्यावर तूर्तास वाहतूक विभागाने या आठवड्यात मार्गाची चाचणी करून अंतिम निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने नियोजित मार्ग बंद राहणार नाही.उड्डाणपुलाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी वाहतूक वळवून नवीन पदपथ बांधणे व इतर नाविन्यपूर्ण सुविधांचा आराखडा तयार करण्याची सूचना केली.


बांगलादेशात भडकला हिंसाचार
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यामुळे बांगलादेशात हिंसाचार उफाळला आणि लष्करी राजवट आली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात आल्या. त्या भारतातून लंडनला जाण्याचा विचार करत आहेत. परंतु त्यांना यूके सरकारकडून आश्रय नाकारण्यात आला. हसीना यांनी आपल्या बहिणीसोबत भारतात आश्रय घेतला आहे.
टीसीपी कायद्यावरून विश्वजीत राणेंवर ताशेरे
मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी नगररचना विभागातील नव्या सुधारणा कायद्याला कडाडून विरोध केला. हे विधेयक मंजूर झाल्यास आगामी काळात त्याचे नकारात्मक परिणाम होतील, असे सांगत या दोन्ही मंत्र्यांनी मंत्री विश्वजित राणे यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळेच हे विधेयक मागे घेण्यात आले. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विधेयकांना विरोध करण्यात आला होता. पण मंत्री त्यांच्या विरोधाची भीक न घालता विधेयक पुढे ढकलत राहिले. मात्र, दोन्ही मंत्र्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर विश्वजीत राणे यांनी विधेयक मागे घेतले.


गोव्यात ड्रग्जला थारा नाही : मुख्यमंत्री
राज्यात ड्रग्जला अजिबात थारा दिला जाणार नाही. अशा प्रकरणांत कठोर कारवाया करण्यात येत आहेत. शाळांच्या परिसरात ड्रग्जची विक्री होत असल्यास त्याची माहिती आमदारांनी अमली पदार्थ विरोधी पथकाला (एएनसी) द्यावी. त्यांच्याकडून कारवाई न झाल्यास आमदारांनी आपल्याकडे यावे​, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.


विनेश फोगट अपात्र
विनेश फोगट ही ऑलिम्पिक इतिहासात अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली. पण नशिबाने फोगटला साथ दिली नाही आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक हुकले. ५० किलो वजनी गटात स्पर्धा करणाऱ्या विनेशचे वजन १०० ग्रॅम भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयामुळे संपूर्ण भारताला धक्का बसला. याप्रकरणी क्रीडा लवादाकडे विनेश फोगटने आपल्याला किमान रौप्य पदक देण्यात यावे, असे अपील केले असून ऑलिम्पिकपूर्वी त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
काळी नदीवरील पूल कोसळला
गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणारा काळी नदीवरील पूल कोसळला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील ४१ वर्षांपूर्वीचा जुना कारवार पूल कोसळला. ही घटना घडली तेव्हा एक ट्रक यापूलावरून जात होता. अचानक पूल कोसळला आणि ट्रक थेट पाण्यात पडला. स्थानिकांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी ट्रक चालकाला वाचवले.

भारताला एक रौप्य, दोन कांस्यपदक
गेल्या बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्राने ८९.४५ मीटर लांब भालाफेक करून रौप्य पदक जिंकले. भारताने स्पेनवर २-१ ने मात करत कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावत याला जपानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ५७ किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या क्रुझचा पराभव करत त्याने कांस्यपदक जिंकले.
जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
राज्यात कुठेही डोंगरकापणी सुरू असली तरी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी आता तलाठ्यांवर असणार आहे. बेकायदा डोंगर कापणीवर पथकाकरवी कारवाई केली जाईल. वायनाडसारखी घटना राज्यात घडू नये, म्हणून उपाय योजना करण्यासाठी धोकादायक दरडींचा शोध घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांना शुक्रवारी त्याच दिवशी नियोजित महत्त्वपूर्ण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीबद्दल मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली. महसूल सचिव आणि एसडीएमए सदस्य सचिव संदिप जॅक आयएएस यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये, असा प्रश्न विचारला आहे आणि नोटीस मिळाल्यापासून ७२ तासांत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत.
मंत्री, आमदारांची दिल्ली वारी
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच मंत्री, आमदारांचे दिल्ली दौरे सुरू झाले. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या मंत्र्यांच्या भांडणाचा मुद्दाही भाजपने गांभिर्याने घेतला आहे. पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्यामुळे खातेबदलाचा प्रस्तावही पक्षाने विचारात घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली दौरे सुरू झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मंत्री रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह मगोचे आमदार जीत आरोलकर आणि काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा सध्या दिल्लीत आहेत. मंत्री फळदेसाई आणि जीत यांनी शुक्रवारी दिल्लीत खासदार सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली. संसदेचे कामकाज कसे चालते हे पाहण्याचे, तसेच केंद्रातील दोन मंत्र्यांच्या भेटी घडवून आणण्याचे आमंत्रण तानावडे यांनी दिले होते. आमदार फेरेरा वैयक्तिक कामासाठी दिल्लीत दाखल झाले.


इतर महत्त्वाचे मुद्दे-
राज्यात १ जून ते २३ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८२ घरांचे नुकसान झाले असून १.४३ कोटींचे नुकसान झाले.
आर्थिक विकास महामंडळाचे (इडीसी) ५० कोटी थकले. ईडीसीने आतापर्यंत ४२ जणांना ६८.४७ कोटी वितरीत केले. ४२ नावांची यादी ईडीसीने खात्यातून काढून टाकली आहे.
राज्यातील मत्स्य उत्पादनात ६,९८० टनांची घट. इसवण, बांगडा, तारल्याच्या उत्पन्नात घट झाली.
शांतीनगर, वास्को महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय संज्योत बोरकर याचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र मित्र डेव्हिड क्रुज (२०) आ​णि सहर्ष भोसले (२४) गंभीर जखमी झाले
आता महिला बचत गट गोव्यातील शाळांना माध्यान्ह आहार पुरवतील. मुलांना दर्जेदार आणि पौष्टिक आहार द्यायचा असेल तर घाबरण्याची गरज नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिले होते.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी २०२० ते १५ जून २०२४ या कालावधीत राज्यातील ५५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. या कालावधीत १४९ गुंडांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागातील रिक्त पदे न भरल्याने डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता, औषध खरेदीचे धोरण नसणे, केंद्राकडून निधीचा वापर न होणे आदी कारणांवरून कॅगचे आरोग्य खात्यावर ताशेरे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गोव्यातील खोतीगावची सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवड केली आहे. देशातील ३५ गावांना हा पुरस्कार देण्यात आला. खोतीगावने ३५ वे स्थान मिळवले आहे.
राज्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र आता मंत्री अशा हडप केलेल्या जमिनी विकत आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी केला आहे.