तानावडेंचा ठाम विश्वास... दिल्लीच्या सातही जागांवर भाजपचाच विजय निश्चित!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 01:48 pm
तानावडेंचा ठाम विश्वास... दिल्लीच्या सातही जागांवर भाजपचाच विजय निश्चित!

नवी दिल्ली : आम आदमी पक्षात महिला नेत्यांनाही सुरक्षा नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संपूर्ण भारतीयांचा विश्वास आहे. कारण, ते जे बोलतात तेच करतात. म्हणूनच दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास भाजपचे दक्षिण दिल्लीचे निवडणूक प्रभारी तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला आहे.

तानावडे यांनी स्थानिक प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल विकासाच्या गप्पा मारत आहेत. पण, दिल्लीत फिरल्यानंतर त्यांचा खरा चेहरा दिसून येतो. दिल्लीत रस्ते नीट नाहीत. अनेक भागांत लोकांना पाणी मिळत नाही. त्यांचे नेते निवडून आल्यानंतर पाणी विकतात. अनेक भागांतील मोहल्ला क्लिनिक गायी म्हशींचे गोठे बनले आहेत. दिल्लीतील जनतेची हालत खूप खराब आहे, अशी टीका तानावडे यांनी यावेळी केली.

भाजपच्या दहा वर्षांत देशातील २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आली आहे. गोव्यात येऊन विकास पहा. गोव्यातील इस्पितळे पहा, म्हणजे समजेल. म्हणूनच भाजपवर जनतेचा विश्वास आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. तसेच दिल्लीतही सातही जागांवर भाजपचा विजय होणार, असे तानावडे यांनी ठामपणे म्हटले आहे.

हेही वाचा