खासदार ठरविण्यात महिलांची पुरुषांवर ‘कुरघोडी’

मागील दोन लोकसभा निवडणुकीत महिला मतदार पुरुषांच्या पुढे

Story: पिनाक कल्लोळी |
26th April, 12:54 am
खासदार ठरविण्यात महिलांची पुरुषांवर ‘कुरघोडी’

गोवन वार्ता
पणजी : राज्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यात गोव्यातील महिला मतदार देशात तिसऱ्या स्थानी होत्या. याशिवाय मागील दोन लोकसभा निवडणुकीत गोव्यात झालेल्या एकूण मतदानात महिला मतदार पुरुषांच्या पुढे आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या अहवालामधून ही माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये गोव्यातील मतदार यादीत एकूण १० लाख ६० हजार ७७७ मतदारांची नोंदणी होती. यात ५ लाख ३२ हजार ४६९ महिला व ५ लाख २८ हजार ३०८ पुरुष मतदार होते. एकूण नोंदणी केलेल्या मतदारांपैकी ८ लाख १७ हजार ४४० जणांनी मतदान केले. यात ४ लाख २० हजार ३० महिला, तर ३ लाख ९७ हजार ४१० पुरुष मतदार होते. एकूण मतदानात महिला मतदारांचे प्रमाण ५१.३८ टक्के, तर पुरुष मतदारांचे प्रमाण ४८.६२ टक्के होते.
त्याचप्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदार यादीत एकूण ११ लाख ३६ हजार ११३ मतदारांची नोंदणी होती. यात ५ लाख ८० हजार ५४ महिला, तर ५ लाख ५६ हजार ०५९ पुरुष मतदार होते. एकूण नोंदणी केलेल्या मतदारांपैकी ८ लाख ५३ हजार ७२५ जणांनी मतदान केले. यात ४ लाख ४१ हजार ७८० महिला, तर ४ लाख ११ हजार ९४४ पुरुष मतदार होते. एकूण मतदानात महिला मतदारांचे प्रमाण ५१.७५ टक्के, तर पुरुष मतदारांचे प्रमाण ४८.२५ टक्के होते.

२००९ च्या निवडणुकीत पुरुष मतदारांचे प्रमाण अधिक
२००९च्या लोकसभा निवडणुकीत मात्र पुरुष मतदार महिलांच्या तुलनेत किंचित पुढे होते. २००९ मध्ये राज्यातील मतदार यादीत एकूण १० लाख २० हजार ७९४ मतदारांची नोंदणी होती. यात ५ लाख ८ हजार ३१९ महिला, तर ५ लाख १२ हजार ४७५ पुरुष मतदार होते. एकूण नोंदणी केलेल्या मतदारांपैकी ५ लाख ६४ हजार २५५ जणांनी मतदान केले. यात २ लाख ७३ हजार ४८२ महिला, तर २ लाख ९० हजार २७८ पुरुष मतदार होते. एकूण मतदानात महिला मतदारांचे प्रमाण ४८.४६ टक्के, तर पुरुष मतदारांचे प्रमाण ५१.४४ टक्के होते.                              

हेही वाचा