पंतप्रधान माेदींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांत उत्साह : मुख्यमंत्री

सभास्थळाची पाहणी : ५० हजार लोकांच्या उपस्थितीचा अंदाज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 12:33 am
पंतप्रधान माेदींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांत उत्साह : मुख्यमंत्री

सभेच्या पूर्वतयारीची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री मॉविन गुदिन्हो, अॅड. नरेंद्र सावईकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार आंतोन वाझ व इतर. (अक्षंदा राणे)  

वास्को : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यावर गोव्याच्या दोन्ही जागांवर मोठा परिणाम होऊन भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचे विजयी मताधिक्य वाढणार आहे हि ‘गॅरंटी’ असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. या सभेला सुमारे ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी (२७ रोजी) सायंकाळी ५ वाजता झुआरीनगर-सांकवाळ मार्गावरील बिट्स पिलानीसमोरच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी घेतला. यावेळी पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, माजी राज्यसभा अॅड. नरेंद्र सावईकर, जयंत जाधव, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी वगैरे उपस्थित होते.

मोदींना पाहण्याची लोकांमध्ये उत्सुकता
लोकांमध्ये मोदी यांना पाहण्याची, ऐकण्याची उत्सुकता असल्याने मोठ्या प्रमाणात लोक सभेला उपस्थित राहणार आहेत. मोदी यांची गॅरंटी असल्याने या सभेनंतर आमच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढणार आहे. मुरगाव तालुक्यात जाहीर सभा होत असल्याने मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून अधिकाअधिक लोक सभेला येण्यासाठी चारही आमदार प्रयत्नशील असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा