उत्तराखंडात २४ तासांत ४६ ठिकाणी जंगलांना आग; ५३.१५ हेक्टर जंगल जळून खाक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 02:18 pm
उत्तराखंडात २४ तासांत ४६ ठिकाणी जंगलांना आग; ५३.१५ हेक्टर जंगल जळून खाक

डेहराडून : उत्तराखंडमधील विविध भागांत गेल्या २४ तासांत जंगलाला आगी लागण्याच्या ४६ घटना घडल्या असून, त्यात ५३.१५ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. राज्याच्या वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ लाख ९ हजार ७०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यात १ नोव्हेंबर २०२३ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत जंगलाला आग लागण्याच्या एकूण ४७७ घटनांची नोंद झाली असून यामध्ये ५७०.०७ हेक्टर जंगलाचे नुकसान झाले आहे. तर, १२ लाख ४० हजार १५१ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तराखंडमध्ये वाढत्या तापमानामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना वाढत असताना, मुख्य सचिव राधा रतुरी यांनी मंगळवारी परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना ते थांबवण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले.

सर्व जिल्हा दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि विभागीय वन अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठकीत सहभागी झाले होते. तर, पोलीस महासंचालक अभिनव कुमार, प्रधान सचिव आर. के. सुधांशू आणि रणजित कुमार सिन्हा उपस्थित होते. बैठकीदरम्यान मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना जंगलातील आगीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जंगलाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच ती तातडीने थांबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचेही रतुरी यांनी सांगितले.

हेही वाचा