इंदोरमध्ये बोटावर मतदानाची शाई दाखवा; फुकट पोहे, जिलेबी, आईस्क्रीम खा!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 11:17 am
इंदोरमध्ये बोटावर मतदानाची शाई दाखवा; फुकट पोहे, जिलेबी, आईस्क्रीम खा!

इंदोर : लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आता याच उद्देशाने इंदोरमधील व्यावसायिकांनीही पाऊल उचलले आहे. १३ रोजी येथे मतदान करणाऱ्या मतदारांना मोफत पोहे, जिलेबी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, नूडल्स आणि मंचुरियन देण्याचा निर्णय इंदूर शहरातील विविध व्यावसायिक संस्था आणि संघटनांनी घेतला आहे. याशिवाय त्यांना खरेदीवर आकर्षक सूटही दिली जाणार आहे.

मतदानात इंदोरला अव्वल करण्यासाठी व्यावसायिकांनीही पावले उचलली आहेत. इंदोरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम आणि अनोखे उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मतदार जागृती संवाद कार्यक्रमात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी , ‘इंदोरला मतदानात नंबर वन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदानात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा‘, असे आवाहन केले आहे.

मतदान हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे. प्रत्येक मतदाराने आपल्या मताधिकाराचा वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि इंदोर प्रथम क्रमांकावर येण्यासाठी समाजातील सर्व घटकांना आपली भूमिका बजावावी लागेल. मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी मार्केट असोसिएशन, फूड असोसिएशन, कॅफे, मॉल हॉटेल असोसिएशन इत्यादी सर्व संस्थांना पुढे यावे लागेल. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावर एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इंदोरमध्ये १३ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना ५६ दुकान संघटना मोफत पोहे, जलेबी देणार आहेत. तसेच, ज्या तरुण मतदारांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यांना मोफत आईस्क्रीम खायला दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे कृष्णपुरा छत्री रोडवरील बजरंग मंदिराजवळील चॉईस चायनीज सेंटरमध्ये मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मोफत मंच्युरियन आणि नूडल्स देण्यात येणार आहेत.

अपना स्वीट्स त्यांच्या सर्व आऊटलेट्स आणि ग्रँड माचल रिसॉर्टवर १० टक्के आकर्षक सूट देणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील निवडक ५० ते ६० मतदान केंद्रांवर मतदारांना नाश्ता आणि थंड पेय मोफत दिले जाणार असल्याचे रोहन झाझरिया यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हॉटेल असोसिएशनकडूनही आकर्षक सवलत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे अनेक संस्थाही आपापल्या स्तरावर मतदार जागृती करण्यासाठी पुढे येत आहेत.

हेही वाचा