सहा वर्षांत १२ हेल्परसह तीन लाईनमन दगावले!

कामावर असताना झाले मृत्यू; सर्वाधिक घटना गतवर्षी


20th April, 12:17 am
सहा वर्षांत १२ हेल्परसह तीन लाईनमन दगावले!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या सहा वर्षांत कामावर असताना वीज खात्यातील एकूण १५ लाईन हेल्पर आणि लाईनमनचा मृत्यू झाला, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी शुक्रवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
डिचोलीतील हाउसिंग बोर्ड परिसरात वीज खांबावर चढून काम करत असताना मनोज जांबावलीकर या लाईनमनचा खांबावरच विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यावरून नागरिक तसेच विरोधी राजकीय पक्षांनी वीज खात्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, दै. ‘गोवन वार्ता’ने अशा घटनांचा आढावा घेतल्यानंतर गेल्या सहा वर्षांत १२ लाईन हेल्पर आणि तीन लाईनमन मिळून एकूण १५ जणांचा कामावर असताना मृत्यू झाला आहे. त्यांतील सर्वाधिक पाच जणांचे मृत्यू २०२३ मध्ये झाले आहेत. २०१८ व २०१९ मध्ये प्रत्येकी एक, २०२० मध्ये चार, २०२२ मध्ये तिघेजण अशा अपघातांत दगावले होते. यंदाच्या वर्षात अशाप्रकारे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी सुमारे बारा जणांच्या कुटुंबांना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळाले असून, सहा जणांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी मिळाली आहे.
        

हेही वाचा