डिचोलीत खांबावर दुरुस्तीकाम करताना वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 01:29 pm
डिचोलीत खांबावर दुरुस्तीकाम करताना वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू!

सांखळी : दुरुस्तीकामासाठी वीज खांबावर चढलेल्या एका लाइनमनला काम करत असतानाच अचनाक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने जीव गमवावा लागला. ही दुर्घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बोर्डे-डिचोली येथे घडली. मनोज वामन जांबावलीकर (३४, रा. गावकारवाडा-पिळगाव) असे या लाइनमनचे नाव असून त्याच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

मनोज हा साधारण तीन वर्षांपूर्वीच वीज खात्यात लाइनमन म्हणून सेवेत दाखल झाला होता. नोकरीला लागल्यानंतर म्हणजे अडीच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. सध्या त्याला एक वर्षाची मुलगी आहे. मनोज डिचोली वीज उपकेंद्रात सेवा बजावत होता. आज सकाळी बोर्डे-डिचोली येथील फिटनेस जीमजवळील खांबावर तो दुरुस्ती कामासाठी चढला होता. दुरुस्ती कामानिमित्त या भागातील वीजपुरवठा आधीच बंद करण्यात आला होता. खांबावर दुरुस्तीकाम सुरू असतानाच अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने मनोजला जोरदार शॉक लागला. यात तो वीजतारांवरच कोसळला आणि मृत झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान लगेच घटनास्थळी दाखल झाले. अखेर लाइनमन खांबावर चढला असताना वीजपुरवठा कसाकाय सुरू झाला, असा प्रश्न उपस्थित झाला. या कारणाने संतप्त झालेल्या पिळगावातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी मनोजचा मृतदेह खाली उतरवण्यास तीव्र विरोध दर्शवला. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून मनोजला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. घटना घडल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत मनोजचा मृतदेह वीज खांबावरच होता. त्यानंतर वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या. नंतरच त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.

दरम्यान, कुठेही लाइनमन खांबावर चढणार असेल तर त्याला विजेचा शॉक बसू नये, यासाठी संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित केला जातो. तसेच लाइनमनला सुरक्षेची साधनेही दिली जातात. पण, मनोज खांबावर चढला तेव्हा त्याच्याकडे सुरक्षेची साधने नव्हती. तसेच, खंडित वीजपुरवठा सुरू झाला. हे कसे घडले? असा प्रश्न मनोजच्या गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, हा प्रकार कोणीतरी जनरेटर स्टार्ट केल्यानंतर त्यातून बॅक करंट वाहू लागल्याने झाला असावा, असा प्राथमिक कयास व्यक्त केला आहे. कारण, काम सुरू असताना उपकेंद्रातून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आता त्याचा तपास सुरू आहे, असेही त्याने सांगितले.

हेही वाचा