मुद्द्यांऐवजी गुद्द्यावर उतरणारे कायद्याचे राज्य कसे देणार ?

Story: राज्यरंग |
18th April, 10:25 pm
मुद्द्यांऐवजी गुद्द्यावर उतरणारे कायद्याचे राज्य कसे देणार ?

देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरावर आहे. बहुतेक मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. जाहीर सभा, कोपरा बैठका, रोड शो, घरोघरी भेटी यांवर भर दिला जात आहे. अलिकडे टीव्ही वृत्तवाहिन्याही प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांना वा त्यांच्या समर्थकांना एकत्र करून लाईव्ह डिबेट शो घेत असतात. हे कार्यक्रम टीव्हीवर दाखवले जात असल्याने हजारो लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी उमेदवारांना एक चांगले साधन उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमात कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणून राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शनही करत आहेत. कुरघोडी करण्याच्या नादात बऱ्याच वेळा प्रकरण गुद्द्यावर येते. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येते. असाच प्रकार जबलपूर येथे नागरिकांनी अनुभवला.

जबलपूरमधील भंवरताल पार्कमध्ये शनिवारी रात्री एका टीव्ही वृत्तवाहिनीने डिबेट शोचे आयोजन केले होते. भाजपचे आमदार अभिलाष पांडे आणि काँग्रेसचे माजी आमदार विनय सक्सेना यांच्यासह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या शोमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका प्रश्नाच्या उत्तरावरून दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली. प्रकरण इतके वाढले की काही वेळातच हाणामारी आणि गदारोळ सुरू झाला. दोन्ही बाजूंनी शिविगाळ व खुर्च्या फेकण्यास सुरुवात झाली. या मारामारीत दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ओमटी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवून घेऊन तपास सुरू केला.

हाणामारीत भाजपचा कार्यकर्ता जखमी झाल्याचा आरोप करून नेते रामजी सिंह म्हणाले, काँग्रेसच्या बाजूने अचानक हल्ला झाला. भाजपचे आमदार अभिलाष पांडे यांनीही या घटनेचा निषेध केला. घटनेचा व्हिडिओ पोलिसांना दिला असून, त्यात काही कार्यकर्त्यांचे कपडे फाडल्याचे दिसत आहे. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार विनय सक्सेना म्हणाले, कार्यक्रमस्थळी गुन्हेगारच जास्त दिसत होते. भाजपचे लोक आक्रमक होते. दोनदा हात जोडून मी त्यांना थांबवले आणि कार्यकर्त्यांच्या कृतीची माहिती आमदारांना दिली. भाजपच्या लोकांनीच काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केला. भाजपचे नेते काँग्रेसच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी वाद, घोषणाबाजी सुरू केली. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांचे जबाबही नोंदवले आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

असे कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांनी परिणामांचा विचार केला पाहिजे. संबंधित प्रशासनाने अशा घटनांसाठी आयोजकांना जबाबदार धरून झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल केली पाहिजे. निवडणुकीच्या काळात वातावरण संवेदनशील असते. एखादा मुद्दाही दंगलीला, समाजातील शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतो. अर्थात अशा कार्यक्रमात वृत्तवाहिनीपासून सहभागी नेत्यांपर्यंत प्रत्येकजण स्वार्थ साधत असतो. समाजहिताचा विचार करून अशा कार्यक्रमांवर बंदी घालणेच योग्य ठरेल.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)