ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; १० ठार, २१ बेपत्ता; ३ हजारांहून अधिक बेघर

ब्राझीलमधील थरकाप उडवणाऱ्या विनाशकारी पावसाची दृश्ये.. पहा व्हीडिओ, छायाचित्रे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 11:28 am
ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; १० ठार, २१ बेपत्ता; ३ हजारांहून अधिक बेघर

रिओ दि जेनेरा : ब्राझीलमध्ये चार दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात या पावसामुळे १० लोकांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी आहेत. तर, सुमारे २१ लोक बेपत्ता आहेत. वादळाचा जबर फटका बसल्याने ३,३०० हून अधिक लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. ही माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

वादळात वीज यंत्रणांची मोडतोड झाल्याने राज्यातील बहुतांश भागांतील वीज आणि पाणीपुरवठा बंद आहे. नद्या आणि नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे अनेक भागांत पूर आला आहे. रस्ते खचले असून भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.


पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी ब्राझीलच्या हवाई दलाला बचाव कार्यात तैनात केले होते. परिस्थिती लक्षात घेऊन दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. दक्षिणेकडील राज्याच्या संकटग्रस्त भागातील मंत्र्यांची १ मे रोजी बैठक झाली. सर्वाधिक प्रभावित भागातील लोकांना वाचवण्यात प्राधान्य देण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली आहे, असे लेफ्टनंट गव्हर्नर गॅब्रिएल सौझा यांनी सांगितले आहे.


दरम्यान, बचाव मोहिमेअंतर्गत १३० हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. संततधार पावसामुळे पुराचा धोका असलेल्या राज्यातील धरणांबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. धरणाचा धोका असलेल्या नद्यांच्या आजूबाजूच्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी पाठवले जात आहे, असेही सूझा यांनी म्हटले आहे.


ब्राझीलच्या राष्ट्रीय हवामान संस्थेने ३० एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील काही भागांत दऱ्या, पर्वत, उतार आणि शहरांमध्ये २४ तासांत १५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ‘एल निनो’मुळे संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील हवामान प्रभावित झाले आहे. यामुळे अधूनमधून नैसर्गिक संकटे कोसळत आहेत. ब्राझीलमध्ये, एल निनोमुळे ऐतिहासिकदृष्ट्या उत्तरेत दुष्काळ आणि दक्षिणेला भयंकर पाऊस पडला आहे.

हेही वाचा

दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण

अमेरिकेला भीषण वादळाचा तडाखा... पत्त्यासारखी कोसळली घरे; अनेकजण जखमी

केनियाला भीषण महापुराचा वेढा; ३८ ठार, १.१० लाख नागरिक बेघर!

तैवानला २५ वर्षांनंतर पुन्हा भूकंपाचा तीव्र धक्का; १ ठार, ५० हून अधिक जखमी

हेही वाचा