म्हापशात पे पार्किंगच्या नावाखाली लुट

भरमसाठ दरवाढीबाबत स्पष्टीकरणाची गोवा कॅनची मागणी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th April, 09:26 am
म्हापशात पे पार्किंगच्या नावाखाली लुट

 म्हापसा : येथील टॅक्सी स्टॅण्डवरील पे पार्किंग शुल्कामध्ये म्हापसा पालिकेने भरमसाठ म्हणजेच तीनपट वाढ करीत ६० रूपये दर लागू केला आहे. हा पे पार्किंगचा दर पणजीतील पे पार्किंग दरापेक्षा महाग असून ग्राहकांची ही लुटमार आहे. गोवा कॅन संस्थेने या दरवाढीवर नाराजी व्यक्त करीत नगरपालिका संचालनालयाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

गेल्या वर्षी पालिकेने टॅक्सी स्थानक तसेच म्हापसा मार्केट परिसरातील पे पार्किंगचे शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार प्रति दोन तास दुचाकीसाठी १०  व चारचाकीसाठी २० रूपये असा दर ठरला होता. या दरानुसार पालिकेने पे पार्किंगची निविदा जारी केली होती.

गेल्या वर्षांप्रमाणेच पालिकेच्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या पे पार्किंग तसेच सोपोची निविदेला कुणी बोलीदार सापडलेला नाही. त्यामुळे पालिकेने स्वतःच्या कर्मचार्‍यांमार्फत या पे पार्किंग व सोपो  शुल्काची वसूली केली जाते. म्हापसा टॅक्सी स्थानकावर दोन तासांसाठी ६० रूपये असे भरमसाठ  पे पार्किंगचे शुल्क आकारले जात असल्याची माहिती कळंगुट येथील जागृत ग्राहक अ‍ॅन्थनी डिसोझा यांनी गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टीन्स यांना दिली. हे शुल्क पणजीतील पे पार्किंग पेक्षा महाग असल्याचे मार्टीन्स यांना समजले. त्यानुसार त्यांनी लगेच नगरविकास खात्याच्या संचलकांना पत्र पाठवले.

म्हापसा पालिकेला या पे पार्किंग शुल्काच्या दरात वाढ करण्याचे कारण आणि तर्क स्पष्ट करण्यास सांगावे. नगरपालिका पे पार्किंगकडे सेवा की व्यवसाय म्हणून पाहते आहे, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश द्यावेत. तसेच पे पार्किंगचा दर ग्राहकांना सेवा याविषयी मार्गदर्शक तत्वे जारी करणे व ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लक्षात घेऊन तक्रार निवारणासाठी एक प्रणाली निश्चित करण्याचे आदेश म्हापसा पालिकेला द्यावा, अशी मागणी मार्टीन्स यांनी पालिका संचालनालयाकडे केली आहे.

दरम्यान, पालिकेने टॅक्सी स्थानकावर चार चाकींसाठी पार्कींग व्यवस्था केली आहे. या स्थानकावरील पे पार्किंग शुल्कामध्ये पालिका अधिकार्‍यांनी भरमसाठ वाढ केली व प्रति दोन तासांसाठी ५० रूपये हे शुल्क घेण्याचे निर्देश वसुली कर्मचार्‍यांना दिले आहेत. गेल्या सोमवार दि. १५ पासून या आदेशाची कार्यवाही कर्मचार्‍यांकडून केले जात आहे.

स्थानकावरील शुल्काची रक्कम नमुद केलेल्या फलकावर ही वाढीव दराची रक्कम लिहून त्याबाबतची माहिती वाहन मालकांना द्यायला हवी होती. पण फलकावरील पुर्वीचे दर खोडून हा बेकायदा प्रकार पालिकेने चालवला आहे. शिवाय पालिका मंडळाने या पे पार्किंग दर वाढीचा निर्णय घेतलेला नाही. तरीही पालिकेकडून ही भरमसाठ वाढ केली आहे.

पालिका मंडळाने गेल्या वर्षी निश्चित केलेल्या पे पार्किंगच्या शुल्काप्रमाणेच बाजारपेठेतील शुल्क वसुल केले जातात. दुचाकींसाठी १० तर चारचाकीसाठी २०  रूपये असा हा दर आहे. पण टॅक्सी स्थानकावरीलच पे पार्किंगच्या दरामध्ये सरळसरळ ४० रूपये वाढ तेही बेकायदेशीरपणे करण्यात आली आहे. या दरवाढीच्या विषयी पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

म्हापशात नगरपालिका आणि कदंब महामंडळाकडून पे पार्किंगच्या नावे लोकांना वेठीस धरत असून वाहनस्वारांकडून भरमसाठ शुल्क आकारत आहे. यामागे पे पार्किंगच्या नावाने म्हापशात मोठे रॅकेट सुरू असून हल्लीच म्हापसा पालिकेच्या एका नगरसेवकाचा ऑडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यातून पालिकेतील लोकप्रतिनिधी आणि पे पार्किंग ठेकेदार यांचे या रॅकेटमध्ये लागेबंध आहेत हे स्पष्ट होत आहे.

दरम्यान येथील नविन व जुन्या कदंब बस स्थानकावर देखील पे पार्किंगच्या नावाखाली भरमाठ शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क देखील पणजी बस स्थानकावरील पे पार्किंग दरापेक्षाही दुप्पट पेक्षा जास्त आहे. या बस स्थानकावर चारचाकीसाठी ५० रूपये, दुचाकीसाठी २० रूपये असे दर आकारले जातात. नविन बस स्थानकावर तर वाहन प्रवेश करताच पे पार्किंगचे शुल्क द्यावे लागते, अन्यथा पे पार्किंग वसुली कामगार हातघाईवर येतात. म्हापसा पालिका तसेच कदंब महामंडळाकडून सेवेच्या नावाखाली शहरात हा एकंदरीत बेकायदा आणि मनमानीचा प्रकार सुरू आहे.

हेही वाचा